लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात शेतकरी महिला निधी एमएन बँकेच्या नावे १० बनावट बँक शाखा उघडून त्यात गुंतवणूक करून जास्त लाभ मिळवून देण्याचे आमिष देत तब्बल २७ हजार ३८३ गुंतवणूकदारांकडून ३८ कोटी ४६ लाख ९५ हजार २४१ रुपयांच्या ठेवी स्वीकारून ठरवून दिलेल्या मुदतीत परतफेड न करता फसवणूक केली होती. याप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर बँक संचालक आरोपी शरद अरुण कांबळे व इतरांच्या १५ कोटी ११ लाख ९० हजार ७०० रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. लवकरच लिलाव करुन पीडित ग्राहकांना मोबदला दिला जाणार असल्याने दिलासा मिळाला आहे.
वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात १० बोगस बँक शाखा उघडून २७ हजार ३८३ गुंतवणूकदारांकडून बचत ठेव, दैनिक ठेव, मुदत ठेवीचे स्वरुपात रक्कम स्वीकारली होती. मुदत ठेवी आणि लाभांशाची परतफेड न करता ग्राहकांची फसवणूक केल्याने २५ जून २०२४ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्याच्या दिनांकापासून ९ महिन्यांच्या कालावधीत आरोपींच्या १५,११,९०,७००.७३ रुपये रकमेच्या मालमत्ता पोलिसांनी शोधून त्या मालमत्ता शासन जप्त करून त्यावर सक्षम प्राधिकारी म्हणून उपविभागीय अधिकाऱ्यांची नेमणूक केल्याचे शासन राजपत्र अधिसूचना ८ एप्रिल २०२५ रोजी शासनाकडून प्रसिद्ध केली. त्यामुळे गुन्ह्यातील पीडितांना येत्या काळात अपहारित रक्कम परतफेड करण्याची कार्यवाही सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत सुरु होणार आहे.
पालकमंत्र्यांकडे केला पाठपुरावाबँक संचालक शरद कांबळे याच्याविरुद्ध कारवाई करत गुंतवणूक केलेल्या रकमेची परतफेड मिळावी, यासाठी पालकमंत्र्यांना साकडे घालण्यात आले होते. तसेच ही बाब शासनस्तरावर मार्गी लावण्यासाठी देखील पालकमंत्री तसेच आर्वी मतदारसंघातील लोकप्रतिनिर्थीकडे पीडितांनी पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याचे फलित झाले.
अपर पोलिस महासंचालकांच्या हस्ते पीडितांना दिली प्रतअप्पर पोलिस महासंचालक अश्वती दोरजे या २६ रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयात दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी अधिसूचना प्रसिद्ध राजपत्राची प्रत पीडित देवानंद बाराहाते यांच्यासह इतर पीडितांना दिली. यावेळी पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे, पोलिस उपअधीक्षक पुंडलिक भटकर, पोलिस उपनिरीक्षक शांताराम मुदमाळी, विवेक राउत, गजानन काळे, संतोष जायस्वाल, शैलेश भारशंकर आदी उपस्थित होते.