जुलैमध्ये जिल्ह्यात दिवसाआड शेतकरी आत्महत्या
By Admin | Updated: July 25, 2015 02:12 IST2015-07-25T02:12:53+5:302015-07-25T02:12:53+5:30
निसर्गाची अवकृपा, शासनाचा नसलेला आधार यामुळे हतबल झालेला शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. वर्धा जिल्ह्यात दिवसाआड शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे विदारक वास्तव आहे.

जुलैमध्ये जिल्ह्यात दिवसाआड शेतकरी आत्महत्या
२० दिवसांत १० आत्महत्यांची नोंद : सहा महिन्यांत ७३ शेतकऱ्यांनी संपविले जीवन
वर्धा: निसर्गाची अवकृपा, शासनाचा नसलेला आधार यामुळे हतबल झालेला शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. वर्धा जिल्ह्यात दिवसाआड शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे विदारक वास्तव आहे. चालू जुलै महिन्यात अवघ्या २० दिवसांत १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्रच सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
जिल्ह्यात कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना शेतकरी करीत आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून मदत जाहीर होते. त्याची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे येते; मात्र प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराचा फटकाही या आत्महत्येत भरच घालत आहे. हक्काची रक्कम मिळविण्याकरिता वडध व वाघोडा सारख्या गावातील शेतकऱ्यांना प्रशासनाकडे आत्महत्येची परवानगी मागावी लागते. एका दाण्याचे शंभर दाणे करणाऱ्या या शेतकऱ्यावर ही वेळ येते हे जिल्ह्यातील विदारक चित्र आहे.
शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू असतानाच जिल्ह्यात पिकांची झालेली अवस्था पाहता गत सहा महिन्यात ७३ आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधिक आत्महत्या फेब्रुवारी महिन्यात झाल्या आहेत. या महिन्यात १३ शेतकऱ्यांनी जीवन संपविल्याचे समोर आले आहे. जानेवारी २०१४ ते जुलै २०१५ या कालावधीत जिल्ह्यातील २०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नव्या खरीप हंगामात पहिला पाऊस ुपडल्यानंतर तब्बल महिनाभर पावसाने दगा दिला. यामुळे अंकुरलेली बिजांची वाढच खुंटली. यामुळे यंदाचा हंगाम हातातून जाताना शेतकऱ्यांना बघवत नसल्यामुळे जुलै महिन्याच्या केवळ २० दिवसांत तब्बल १० शेतकऱ्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. याबाबत शासनाला ना खंत ना उसंत असल्याचे दिसून येते.
स्थानिक लोकप्रतिनिधी साधे सांत्वना करण्यासाठी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेताना दिसून आले नाही. वर्धा जिल्हा विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोडतो. सरकार बदललेले मात्र हा शिक्का पुसला गेला नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. (प्रतिनिधी)
मदतीकरिताही आत्महत्येची परवानगी मागण्याची वेळ
विदर्भात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून वर्धेची नोंद आहे. यामुळे शेतकऱ्यांकरिता असलेल्या विविध योजना राबविताना जिल्ह्याचा विचार प्रथम होणे अपेक्षित आहे. तसे होतही आहे; मात्र शासनाच्या अधिकाऱ्यांकडून ती राबविताना हयगय होत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना या मदतीपासून वंचित राहण्याची वेळ येत आहे. ही मदत मिळण्याकरिताही शेतकऱ्यांना आत्महत्येची परवानगी मागण्याची वेळी या जिल्ह्यात येत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १,२१८ आत्महत्या
जिल्ह्यात सन २००१ पासून आतापर्यंत १ हजार २१८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी ५५७ शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळाली आहे. ६५२ शेतकऱ्याच्या आत्महत्या मदतीकरिता अपात्र ठरविण्यात आल्या आहेत.