वन्य प्राण्यांच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त
By Admin | Updated: October 27, 2016 00:50 IST2016-10-27T00:50:37+5:302016-10-27T00:50:37+5:30
परिसरात वन्यप्राण्यांनी हैदोस घातल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वन्यप्राणी कळपाने येऊन शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे.

वन्य प्राण्यांच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त
वनविभागाचे दुर्लक्ष : पिकांचे नुकसान, बंदोबस्ताची मागणी
वर्धा : परिसरात वन्यप्राण्यांनी हैदोस घातल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वन्यप्राणी कळपाने येऊन शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे. वनविभागाने वडनेर येथे विभागीय कार्यालय सुरू के आहे. परंतु हे कार्यालय नेहमी कुलूपबंद असते. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागते. याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
कोसुर्ला, गाडेगाव, डौलापूर, पोटी, कापसी, अंतरगाव आदी गावांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. रोही, रानडुकर, वानर आदींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिसरात रोह्यांचे २० ते २५ कळप असून एका कळपात ५० ते ६० रोही आहेत. रात्रीच्या सुमारास रोह्यांचा कळप शेतात शिरून पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान करीत आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. उत्पादित मालाला बाजारभाव मिळत नाही. त्यातच वन्यप्राणी पिकांची नासाडी करीत आहे. चौफेर चक्रव्यूहात सापडलेल्या शेतकऱ्यांना जगावे की, मरावे असा प्रश्न पडला आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी वन विभागाने वडनेर येथे विभागीय कार्यालय सुरू केले, परंतु हे कार्यालय नेहमी कुलूप बंद असते. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील सिरसगाव, आर्वी, काचनगाव, पवनी, निधा, टाकळी, मनसावळी, अलमडोह, सोनेगाव, चाणकी, गाडेगाव, कानगाव, कोसुर्ला, डौलापूर, कापसी, कान्होली, खानगाव, वरूड, मोझरी, भैयापूर येथील शेतकऱ्यांकडून होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)