अवास्तव वीज बिलांमुळे शेतकरी त्रस्त
By Admin | Updated: March 25, 2015 02:00 IST2015-03-25T02:00:07+5:302015-03-25T02:00:07+5:30
महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज पुरवठा दिला़ यासाठी थ्री-फेसचा वीज पुरवठा दिला जातो़ यातील बिलामध्ये मोठा घोळ दिसून येतो़ ..

अवास्तव वीज बिलांमुळे शेतकरी त्रस्त
सेलगाव (लवणे) : महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज पुरवठा दिला़ यासाठी थ्री-फेसचा वीज पुरवठा दिला जातो़ यातील बिलामध्ये मोठा घोळ दिसून येतो़ वापर कमी असताना अधिक बिल दिले जात असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़
परिसरातील शेतकऱ्यांना वीज कंपनीद्वारे कृषी पंपासाठी वीज जोडणी देण्यात आली आहे़ यात काही शेतकरी ३ एचपीचे कृषी पंप तर काही ५ एचपीचे पंप वापरत आहेत़ तीन एचपीच्या पंपाकरिता कमी वीज लागत असताना अवास्तव बिले दिली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून होत आहे़ ज्या शेतकऱ्यांनी ५ एचपीचे पंप संच बसविले, त्यांना अधिक बिल आल्यास वावगे वाटणार नाही; पण ३ एचपीचे संच वापणाऱ्या शेतकऱ्यांना ५ एचपीच्या संचानुसार बिल दिले जात आहे़ तीन व पाच एचपीचे पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना सारखीच बिले येत असल्याचेही दिसून येत आहे़
शासनाने हिवाळी अधिवेशनात कृषी संजीवनी योजनेस मुदतवाढ दिली; पण जानेवारी ते मार्च दरम्यान अधिक वापर दाखवून बिलांच्या रक्कमेत भरमसाठ वाढ करण्यात आली आहे़ यामुळे वापर कमी आणि बिल अधिक, अशी स्थिती दिसते़ मागील वर्षी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना वीज बिलात माफी देण्याचे धोरण शासनाने ठरविले असताना ते बिलही माफीत न दाखविता या बिलात समाविष्ट असल्याचे आहे़ ज्या दिवसांत शेतकरी विजेचा अत्यल्प वापर करतात त्या दिवसांची बिलात माफी देऊन शासनाने शेतकऱ्यांच्या जखमेतवर मीठ चोळल्याचेच दिसून येते़ वीज वितरण कंपनीने कृषी संजीवनी योजनेस मुदतवाढ द्यावी आणि परिसरातील मोटर संचाची चौकशी करून वापराप्रमाणे बिल द्यावे, अशी मागणीही शेतकऱ्यांद्वारे करण्यात येत आहे़(वार्ताहर)