शेतकऱ्यांचा दुकानात ठिय्या
By Admin | Updated: July 29, 2015 02:08 IST2015-07-29T02:08:41+5:302015-07-29T02:08:41+5:30
कापूस व्यापारी वीरेंद्र संकलेचा याला विक्री केलेल्या कापसाची ५४ लाख रुपयांची वसुली करीत शेतकऱ्यांनी मुख्य बाजारपेठेतील संकलेचा जनरल स्टोअर्समध्ये रविवारी

शेतकऱ्यांचा दुकानात ठिय्या
संकलेचा फसवणूक प्रकरण : ५४ लाखांची वसुली देण्याची मागणी
आर्वी : कापूस व्यापारी वीरेंद्र संकलेचा याला विक्री केलेल्या कापसाची ५४ लाख रुपयांची वसुली करीत शेतकऱ्यांनी मुख्य बाजारपेठेतील संकलेचा जनरल स्टोअर्समध्ये रविवारी २६ दुपारी तीन वाजेपर्यंत ठिय्या मांडला. २५ टक्के रक्कम देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे.
कापूस व्यापारी संकलेचा याने २०१४-१५ या हंगामात शेतकऱ्यांकडून साई जिनिंगच्या नावाने कापूस खरेदी केला. मार्चपावेतो त्याने कापसाचे व्यवस्थित चुकारे दिले. मात्र त्यानंतर शेतकऱ्यांची देणी वाढली. परिणामी त्याने चालढकल सुरू केली आणि १२ जूनला शहरातून पलायन केले. याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संकलेचा याची जामिनावर सुटका झाली. त्याने शिरपूर (बोके) येथे जाऊन शेतकऱ्यांसोबत संपर्क साधला आणि पैसे देण्याची कबुली देत शेतकऱ्यांना बोलविले. न्यायालयीन निकाल होईपर्यंत कापसाचे पैसे मिळणार नाही, अशी भावना निर्माण झालेल्या शेतकऱ्यांनी २३ जुलैला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाचा ताबा घेतला आणि कापसाचे पैसे मिळवून द्या अन्यथा आत्महत्या करू, असा निर्धार बोलून दाखविला. याविषयी माहिती मिळताच ठाणेदार शैलेश साळवी पोलीस ताफ्यासह दाखल झाले. शेतकऱ्यांचा रोष पाहता यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव पंजाब राठोड यांनी व्यापारी संकलेचा याला बोलावून घेतले.
या प्रसंगीसुद्धा व्यापारी वीरेंद्र संकलेचा याने पैशाची व्यवस्था करतो, असे सांगून वेळ मारून नेली आणि दुसऱ्या दिवशीही पैसे दिले नाही. परिणामी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी हक्काचा पैसा मिळविण्याकरिता संकलेचा याच्या दुकानाचा ताबा घेत ठिय्या मांडला.
जोवर कापूस व्यापारी संकलेचा कापसाचे पैसे देत नाही, तोवर लढा सोडणार नाही असा पक्का निर्धार शेतकऱ्यांनी केला. तसेच शेतीकामाकरिता २५ टक्के रक्कम जरी दिली तरी दुकान सोडू; अन्यथा सोडणार नाही अशी भूमिका घेतली. तसेच या आंदोलनात पत्नी, मूलबाळसुद्धा सहभागी होण्याचा होऊन संकलेचा याच्या घराचा ताबा घेणार असल्याचा निर्धारही बोलून दाखविला आहे.(तालुका प्रतिनिधी)