शेतकरी मदतीचे १.८९ कोटी प्राप्त
By Admin | Updated: August 9, 2015 02:14 IST2015-08-09T02:14:40+5:302015-08-09T02:14:40+5:30
तालुक्यात रबी हंगामात झालेली गारपीट व वादळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होेते.

शेतकरी मदतीचे १.८९ कोटी प्राप्त
आर्वी : तालुक्यात रबी हंगामात झालेली गारपीट व वादळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होेते. या नुकसाननीकरिता शासनाच्यावतीने मदत जाहीर झाली होती. त्याचा पहिला टप्पा मिळाल्यानंतर त्याचा लाभ २ हजार १८७ शेतकऱ्यांना मिळाला. उर्वरीत शेतकऱ्यांकरिता आवश्यक असलेली १ कोटी ८८ लाख ९५ हजार ७५० रुपयांचा दुसरा हप्ता तालुक्याला मिळाला आहे.
२०१५ च्या फेब्रुवारी महिन्यात रब्बी हंगामात झालेल्या तालुक्यातील गारपीट व वादळी पावसाच्या तडाख्याने शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्या शेत पिकांच्या नुकसानीची सानुग्रह मदत म्हणून महसूल विभागाच्या सर्वेक्षणानुसार २ कोटी ८४ लाख ९७ हजार ७५० रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ९६ लाख रुपये मिळाले होता. उर्वरीत अनुदानाचा दुसरा टप्पा १ कोटी ८८ लाख ९५ हजार ७५० रुपये १ आॅगस्ट रोजी प्राप्त झाला आहे. या दुसऱ्या टप्प्यात तालुक्यातील पाच हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
गत तीन वर्षांपासून तालुक्यात अवकाळी पावसाच्या थैमानाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यात शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना मदत स्वरूपात हेक्टरी नुकसान भरपाई अनुदान प्राप्त झाले.
यात दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांना नुकसानीच्या अनुदानाची रक्कम देण्यात येणार आहे. ही अनुदानाची रक्कम संबंधित व शेतकऱ्यांच्या खात्यात थेट बँक खात्याद्वारे जमा करण्यात येणार आहे. यात कृषी विभाग व महसूल विभागाच्यावतीने लाभार्थी शेतकऱ्यांची यादी बँकेला पाठवून ती रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
हे अनुदान महसूल मंडळ निहाय लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून त्यांना बँकेमार्फत तातडीने अनुदानाची रक्कम देण्यात येणार आहे. असे असले तरी बँक खात्यात रक्कम जमा होण्यास विलंब लागत असल्याची ओरड आहे.(तालुका प्रतिनिधी)