वर्धेतून फुंकला होता शेतकरी स्वातंत्र्याचा बिगूल
By Admin | Updated: December 13, 2015 02:13 IST2015-12-13T02:13:47+5:302015-12-13T02:13:47+5:30
म.गांधी व आचार्य विनोबा भावे यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी वर्धा ही आंदोलन भूमी केली होती.

वर्धेतून फुंकला होता शेतकरी स्वातंत्र्याचा बिगूल
आठवणीतले शरद जोशी : सरोज काशीकर यांच्याकडील अविस्मरणीय नोंदी
वर्धा : म.गांधी व आचार्य विनोबा भावे यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी वर्धा ही आंदोलन भूमी केली होती. ही पार्श्वभूमी ध्यानात घेत शेतकरी नेते शरद जोशी यांनीही शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी वर्धा आंदोलनाची भूमी निश्चित केली. याच भूमीतून शेतकरी संघटनेचा पाया मजबूत झाला. येथे शरद जोशी यांनी केलेल्या आंदोलनाने शासनाच्या पायाखालची वाळू सरकली. वर्धेच्या मातीशी त्यांची जुळलेली नाळ शेवटच्या श्वासापर्यंत कायम होती. त्यांच्या रूपाने शेतकरी आंदोलकांचा राजा हरपला. त्यांची आंदोलने निधनानंतरही स्मृती रूपात शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्याचे बळ देत राहील, अशा शब्दात शेतकरी संघटनेच्या उच्चाधिकार समितीच्या अध्यक्ष सरोज काशीकर यांनी त्यांच्या वर्धेतील आठवणींना उजाळा दिला.
१९७८-८९ मध्ये विजय जावंधिया, रवी काशीकर, सुमंत पाटील, विजय काटकर, शशांक सबाने, अरुण डोंगरे, सुभाष बोकडे, रंगराव वैद्य ही मंडळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विचार करीत. अशातच त्यांना शरद जोशींबाबत कळले. त्यांनी जोशी यांना त्यावेळी वर्धेत आणून शेतकऱ्यांचे शिबिर घेतले. शिबिराला सुमारे शंभर शेतकरी हजर होते. त्यावेळी त्यांनी ‘भारतीय शेतीची पराधीनता’ ही पुस्तिका प्रकाशित केली. ही त्यांच्या शेतकरी आंदोलनाची पहिली लेखन पुस्तिका होती. वसंत तुपकर, लांबट ही मंडळी याची साक्षीदार होती. या पुस्तिकेच्या माध्यमातून त्यांनी भविष्यातील शेतकरी आंदोलनाची रूपरेषाच सांगून टाकली. आंदोलनाच्या माध्यमातून ते अनेकदा वर्धेला आले. ग्रामीण शेतकरी व त्यांच्या पत्नीची बिकट परिस्थितीशी सुरू असलेली झुंज ते स्वत: बघायचे. विश्राम भवनात ते कधीही राहिले नाही. शेतकऱ्यांच्या घरीच जे असेल ते जेवण करीत होते. ते प्रकृती चांगली असेपर्यंत कार्यकर्त्यांत राहायचे. कार्यकर्ते जेथे झोपतील, तेथेच ते आपली व्यवस्था करीत. तो आंदोलकांसोबत राहणारा आंदोलक होता. त्यांना डोंगर चढायची आवड होती. शिवाजी महाराजांनी लढाया जिंकल्या त्या डोंगर चढून, आपल्याला शेतकऱ्यांची लढाई जिंकायची आहे, तेव्हा डोंगर चढता आले पाहिजे, अशी कोटी करीत ते रस्त्यात डोंगर दिसले की गाडी थांबवून चढत. प्रत्येकाची जातीने चौकशी करीत. नाश्ता कमी पडला तर ते स्वत: किचनमध्ये जात मदत करीत. त्यांना थालीपीठ व शिळ्या पोळ्यांचा कुस्कारा आवडे. चांगले दही कसे करायचे, याचे सल्लेही ते देत असत. त्यांची मुलगी गौरी सेवाग्राम येथे शिकायला होती. ती एमडी झाली. अमेरिकेत नामांकित कंपनीत क्वॉलिटी मॅनेजमेंट पदावर आहे. दुसऱ्या दिवशी आंदोलन आहे, काय होईल याची पर्वा न करता हसत खेळत असत. अशा अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या जाण्याने शेतकरी चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली, असे सांगताना त्या भाऊक झाल्या होत्या.