व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक
By Admin | Updated: December 8, 2015 02:45 IST2015-12-08T02:45:17+5:302015-12-08T02:45:17+5:30
येथील बाजार समितीत खरेदीच्या वेळी सांगण्यात येत असलेला दर जिनिंगमध्ये गेल्यानंतर देण्यास व्यापाऱ्यांकडून

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक
हिंगणघाट : येथील बाजार समितीत खरेदीच्या वेळी सांगण्यात येत असलेला दर जिनिंगमध्ये गेल्यानंतर देण्यास व्यापाऱ्यांकडून टाळाटाळ होत असल्याचा खळबळजनक प्रकार हिंगणघाट बाजार सिमतीत उजेडात आला आहे. कापूस जिनिंगमध्ये गेल्यानंतर व्यापाऱ्यांकडून दर्जाबाबत वाद उपस्थित करून शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे, असे निवदेन काही शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी यांना सादर केले.
जिल्ह्यातील मोठी व शेतकऱ्यांच्या हिताची बाजार समिती म्हणून हिंगणघाट बाजार समितीची ओळख आहे. यामुळे येथे येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहेत. येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा व्यापाऱ्यांनी नवाच प्रकार सुरू केला आहे. बाजार समितीत एका दरात कापूस खरेदी करायचा, यानंतर सदर कापूस जिनिंगवर गेला असता त्यांच्या दर्जाबाबत कारण काढत शेतकऱ्यांची वाद घालत त्याला कमी पैसे देण्याचा प्रकार सुरू झाला आहे. हा प्रकार वाढत असून यावर आळा आणण्याकरिता बाजार समितीत ग्रेडर आणावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शिवाय शेतकऱ्यांपासून खरेदी केलेला शेतमाल व्यापाराचा होत असल्याने तो गाडीतून काढण्याची जाबाबदारी व्यापाऱ्याची असताना व्यापारी त्याचे पैसे शेतकऱ्यांकडून पैसे घेत असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.
या समस्यांकडे तीन दिवसात निर्णय, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निवदेन देणाऱ्यांनी दिला आहे. यावेळी छत्रपती रामराव वादाफळे, प्रशांत वादाफळे, अंकित दारूंडे, पवन बावणे, गणेश दारूंडे, रघुनाथ दारूंडे उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)