मदतीसाठी शेतकऱ्यांची फरफट
By Admin | Updated: February 19, 2015 01:30 IST2015-02-19T01:30:19+5:302015-02-19T01:30:19+5:30
नैसर्गिक आपत्तीचे शासकीय अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते़ यामुळे आपल्या खात्यात रक्कम जमा झाली की नाही, हे तपासण्यासाठी ..

मदतीसाठी शेतकऱ्यांची फरफट
सेलू : नैसर्गिक आपत्तीचे शासकीय अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते़ यामुळे आपल्या खात्यात रक्कम जमा झाली की नाही, हे तपासण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेत चकरा माराव्या लागतात़ तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना अद्यापही हे अनुदान मिळालेच नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत़ संबंधित प्रशासन व बँक व्यवस्थापनाने याकडे लक्ष देत शेतकऱ्यांना त्वरित अनुदान वळते करणे गरजेचे झाले आहे़
शासनाने सर्वेक्षण करून तलाठी कार्यालयामार्फत अनुदान पात्र लाभार्थ्यांच्या याद्या तयार केल्यात़ यानंतर संबंधित शेतकऱ्यांसाठी लागणारे अनुदानही संबंधित प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आल्या़ यानंतर पूढील कारवाई सुरू झाली़ संबंधित विभाग नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम काही दिवसांपासून जमा करीत आहे; पण काही मौजातील शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम अद्यापही जमा झालेली नाही. आज वा उद्या ही रक्कम जमा होईल, या आशेमुळे शेतकरी वारंवार बँकेत चकरा मारतात; पण त्यांची निराशाच होत आहे़ या तालुक्यातील काही राष्ट्रीयकृत बँकेत पासबुकावर नोंद करणारी मशीनच बंद असल्याने शेतकऱ्यांना आल्यापावली बँकेतून परतून जावे लागत असल्याचे दिसते़
बहुतांश शेतकऱ्यांकडे पीक कर्ज थकित आहे़ अशा शेतकऱ्यांच्या खात्यात टाकलेली मदतीची रक्कम लिंक आणि बँकिंगच्या सॉफ्टवेअरमुळे कर्ज खात्यात जमा होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी बँकेत सातत्याने गर्दी दिसून येत आहे. कर्ज खात्यात जमा झालेली हे रक्कम पुन्हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठीही बँकांमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांची भेट ्घ्यावी लागत आहे़ सर्व शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचे अनुदान मिळणार असल्याचे महसूल विभागने सांगितले आहे़ यामुळे शेतकऱ्यांना आपल्या खात्यात ही रक्कम जमा झाली असावी म्हणून शेतकरी बँकेत चकरा मारत असल्याचे दिसते़(शहर प्रतिनिधी)
बँकेचा खाते क्रमांकातील चुकीमुळे त्रास; वेळेचाही होतोय अपव्यय
शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याचा क्रमांक तलाठी कार्यालयात दिला; पण निधी जमा करताना खाते क्रमांकात चुक होत असल्यसाने या शेतकऱ्यांचा निधी दुसऱ्याच्या खात्यात जमा होण्याचे प्रकारही घडत असल्याचे उघडकीस आले आहे. ही रक्कम पुन्हा परत मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेत चकरा माराव्या लागत असल्याचे दिसून येत आहे़ प्रशासन आणि बँकेमध्ये शेतकरी पिचला जात आहे़
प्रत्येक गावात राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा नसल्याने व बँकेत होत असलेल्या गर्दीमुळे शेतकऱ्यांना आपल्या खात्यात पैसे का जमा झाले नाही, याची माहिती मिळविण्यासाठी बँकेत व तलाठी कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे़ दररोज होणाऱ्या या हेलपाट्यांमुळे शेतकऱ्यांच्या वेळेचा अपव्यय होताना दिसते़
शिवाय आपल्या गावात बँक नसलेले शेतकरी दुसऱ्या गावात जाऊन चौकशी करीत असल्याने नाहक आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे़