अनामत कापसाच्या चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांची ससेहोलपट
By Admin | Updated: January 10, 2015 23:00 IST2015-01-10T23:00:38+5:302015-01-10T23:00:38+5:30
कापूस संकलन केंद्रावर कापूस विक्रीसाठी घेवून जाणाऱ्या शेतकऱ्यांना पुढे भाव वाढ होत असल्याचे गाजर दाखवित कापूस अनामतमध्ये एक रुपयाही न देता घेतल्या जातो़ ज्यावेळेस शेतकरी

अनामत कापसाच्या चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांची ससेहोलपट
सेलू : कापूस संकलन केंद्रावर कापूस विक्रीसाठी घेवून जाणाऱ्या शेतकऱ्यांना पुढे भाव वाढ होत असल्याचे गाजर दाखवित कापूस अनामतमध्ये एक रुपयाही न देता घेतल्या जातो़ ज्यावेळेस शेतकरी अनामत कापसाचा भाव मागण्यासाठी जातो़ त्या दिवशी त्याला चुकाऱ्याची रक्कम न देता पंधरा ते महिनाभर चकरा माराव्या लागत असल्याचा प्रकार येथील एका काूपस संकलन केंद्रावर सुरू आहे़
अनामत कापूस ठेवून घेणे व त्याचा चुकारा निर्धारीत काळात न देणे हा कायदेशीर व्यवहार नाही; मात्र एका मालकाने सर्व नियम धाब्यावर बसवून जिनिंगच्या आवारात अनामत टाकलेल्या कापसाचा भाव तोडल्यानंतर १५ दिवसांनी चुकारा मिळेल असे सूचना फलक लावून कायदा पायदळी तुटवला आहे़ संबंधीत अधिकाऱ्यांच्या मते हा प्रकार बेकायदेशीर असून अशा पद्धतीची तक्रार आल्यास तत्काळ कारवाईचे संकेत दिले आहे़ प्रकार चुकीचा असल्याचे अधिकारी सांगत आहेत; मग कारवाई करीता तक्रारीची गरज का असा सवाल उपस्थित होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमानुसार धान्याचा चुकारा चोवीस तासात व कापसाचा चुकारा आठ दहा दिवसात देण्याचा नियम आहे़(तालुका प्रतिनिधी)
जिनिंग मालक अनामतमध्ये कापूस घेत असेल़ जिनिंगच्या आवारात तशा सूचना लावून अनामत कापसाचे १५ दिवसांनी चुकारे देण्याची पत्रक लावले असेल तर हा व्यवहार नियमाबाह्य आहे़ जिनिंगमालकांना अनामत कापूस ठेवता येत नाही़ यात शेतकऱ्यांची फसवणूक होवू शकते़ शेतकऱ्यांकडून तक्रार आली तर तात्काळ जिनिंगवर कारवाई करून फलक काढण्याचे व असा व्यवहार बेकायदेशीर असल्याने ते काढण्याचे आदेश दिल्या जाईल व त्यांच्यावर कारवाई केल्या जाईल़ शेतकऱ्यांनी यापासून सावध रहावे, तक्रार असल्यास माझ्याशी संपर्क साधावा़
- एम़ए़ कृपलानी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, सेलू, तसेच प्रशासक कृउबास सिंदी (रेल्वे), सेलू