स्प्रिंकलर अनुदानासाठी शेतकऱ्यांची फरफट
By Admin | Updated: March 16, 2015 01:43 IST2015-03-16T01:43:14+5:302015-03-16T01:43:14+5:30
कमी पाण्यात अधिक सिंचन व्हावे म्हणून कृषी विभागामार्फत सबसिडीची योजना राबविली जाते; पण कृषी विभागाच्या अडेलतट्टू धोरणामुळे शेतकऱ्यांना वर्षभर....

स्प्रिंकलर अनुदानासाठी शेतकऱ्यांची फरफट
आकोली : कमी पाण्यात अधिक सिंचन व्हावे म्हणून कृषी विभागामार्फत सबसिडीची योजना राबविली जाते; पण कृषी विभागाच्या अडेलतट्टू धोरणामुळे शेतकऱ्यांना वर्षभर अनुदान प्राप्त होत नाही़ शेतकऱ्यांना तालुका व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत़ याकडे लक्ष देत अनुदान मिळवून देण्याची मागणी होत आहे़
सुकळी (बाई) येथील युवा शेतकरी नीलेश गौळकार यांनी फेब्रुवारी २०१४ मध्ये साई एन्टरप्राईजेस वर्धा येथून जैन कंपनीच्या स्प्रिंकलरची उचल केली़ २८ हजार रुपयांचे स्प्रिंकलरवर १४ हजार रुपये अनुदान आहे़ सर्व कागदपत्रांची पुर्तता करून अनुदानाचा प्रस्ताव सेलू तालुका कृषी विभागाकडे सादर करण्यात आला़ अनेकदा तालुका कृषी कार्यालयात चकरा मारल्यानंतर त्यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला़ ते जिल्हा कार्यालयात गेले असता तुमचा प्रस्तावच आला नसल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले़ ते लगेच तालुका कृषी कार्यालयात गेले असता सदर अनुदानाचा प्रस्ताव तेथेच पडून असल्याचे आढळले़
प्रस्ताव जिल्हा कार्यालयात गेल्यानंतर शेतकऱ्याने अनेकदा कार्यालयाचे उंबरठे झिजविले; पण अनुदान देण्याकरिता निधी नाही, निधी आला की, घरपोच धनादेश मिळेल, असे सांगण्यात आले़ वर्ष लोटले; पण शेतकऱ्याला धनादेश मिळाला नाही़ या प्रकारामुळे शेतकरी त्रस्त असून त्वरित अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे़(वार्ताहर)