आर्थिक मदतीसाठी शेतकऱ्याची पायपीट
By Admin | Updated: June 14, 2014 23:47 IST2014-06-14T23:47:00+5:302014-06-14T23:47:00+5:30
नजिकच्या कानगाव येथील रहिवासी भाऊराव महादेव भरडे (६५) यांची मौजा कानगाव येथे ५ एकर शेती आहे. दि.२० मे रोजी अचानक वादळ व विजेच्या कडकडाट झाला. वादळात शेतातील गोठ्यावर वीज पडली.

आर्थिक मदतीसाठी शेतकऱ्याची पायपीट
वायगाव (नि.) : नजिकच्या कानगाव येथील रहिवासी भाऊराव महादेव भरडे (६५) यांची मौजा कानगाव येथे ५ एकर शेती आहे. दि.२० मे रोजी अचानक वादळ व विजेच्या कडकडाट झाला. वादळात शेतातील गोठ्यावर वीज पडली. विद्युत स्पार्किंग गोठ्याला आग लागल्याने सदर शेतकऱ्याचे दीड लाखांच्या घरात नुकसान झाले. एकाएकी आलेल्या या संकटामुळे सदर शेतकरी हतबल झाला आहे.
या आगीत १ गाय, १ बैल, १० कोंबड्या या मृत पावल्या. त्या गोठ्यातील पिव्हीसी पाईप ६०० फूट, जनावरांचा कडबा - कुटार व शेतात टाकण्यासाठी ठेवलेले बि-बियाणे व शेती उपयोगी साहित्य भस्म झाले. मात्र १ बैलाला गावकऱ्यांनी वाचवले. तो बैल सुद्धा गंभीर जखमी आहे. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले.
शेती गावाच्या बाहेर असल्याने व कोणालाही दिसली नाही. मात्र आगीने उग्ररूप धारण केल्यामुळे ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आली. त्यात शेतकऱ्यासह ग्रामस्थ घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत उशिर झाला होता.
भाऊराव भरडे हा अल्प भूदारक शेतकरी आहे. गेल्या दोन वर्षापासून नापिकीला तोंड देत आहे. गेल्या वर्षी तोंडी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला. अशातच भाऊराव भरडे या शेतकऱ्यावर बँक आॅफ इंडिया बँकेचे १ लाख रूपये कर्ज असून खाजगी कर्ज अंदाजे २ लाखांच्या जवळपास आहे. मात्र नापिकीने त्याचे कर्ज फेडणे शक्य झाले नाही. त्यात पुन्हा नवीन संकट आल्याने शेतकरी भाऊराव भरडे हा हवालदील झाला आहे. आता नव्याने उभे होण्यासाठी शेती करण्यासाठी बैल जोडी, बि-बियाणे, खत कसे घ्यावे व शेती कशी करायची हा प्रश्नच उभा झाला आहे. सदर शेतकऱ्याने पालकमंत्री, खासदार व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिली. मात्र काहीही उपयोग झाला नाही. न्याय मिळावा यासाठी सतत येरझारा मारत असून अजूनही अजूनही यावर अधिकारी लक्ष देण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येते. तरी संबंधीत अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.(वार्ताहर)