लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील बाजार समितीमधील तीन शेड गेल्या वर्षभरापासून भाजी बाजाराकरिता वापरली जात असल्याने शेतमाल ठेवण्याकरिता सध्या दोनच शेड उपलब्ध आहेत. अशातच आता लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना खरेदी केलेला शेतमाल साठविण्याची अडचण असल्याने तो शेडमध्ये दिसून येत आहे. परिणामी शेतकऱ्यांना आपला शेतमाला उघड्यावर ठेवावा लागतो. पावसाने हजेरी लावली तर शेतकऱ्यांना नुकसानीचाही सामना करावा लागत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कडक निर्बंध लादल्याने बाजार समित्याही बंद होत्या. त्यासोबतच राज्यभरातही लॉकडाऊन असल्याने व्यापाऱ्यांना वाहनाअभावी कृषी उत्पन्न बाजार समितीतील खरेदी केलेला शेतमाल इतरत्र हलविता आला नाही. शिथिलता मिळाल्यानंतर काही प्रमाणात शेतमाल इतर ठिकाणी हलविला. तसेच बाजारात शेतमालाची आवकही वाढायला लागल्याने यात शेतमालाची आणखी भर पडली. त्यामुळे बाजार समितीमध्ये खरेदी केलेला शेतमाल व्यापाऱ्यांना उचलण्यासाठी काही कालावधी लागत आहे. दोनच शेड असल्याने व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला शेतमाल आणि शेतकऱ्यांचा विक्रीकरिता आलेला शेतमाल ठेवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातच पावसाने हजेरी लावली तर शेडबाहेर असलेला शेतमाल ओला होऊन शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे.
बाजार समितीतील व्यवस्थाबाजार समितीमध्ये आवाक वाढली असून शेतकऱ्यांचा शेतमाल उघड्यावर तर व्यापाऱ्यांचा शेडमध्ये अशी अवस्था आहे. त्यामुळे पाऊस आल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. गुरुवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने माझ्या शेतमालासोबतच काही शेतकऱ्यांचा शेतमाल ओला झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती.- गौरव लोखंडे,शेतकरी बेलगाव.
बाजार समितीमध्ये पाच शेडची व्यवस्था असून वर्षभरापासून तीन शेड भाजी बाजाराकरिता दिले आहे. आता शेतमालाकरिता दोनच शेड उपलब्ध आहेत. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे खरेदी केलेले धान्य शेडमध्ये होते. शिथिलता मिळाल्यानंतर त्यांनी ते त्यांच्या गोदामात नेले. आता आवक वाढल्याने व्यापाऱ्यांनाही खरेदी केलेले धान्य उचलन्यासाठी थोडा वेळ लागत आहे. त्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. नुकताच जुन्या शेडमध्ये धान्य ठेवण्याची व्यवस्था केली आहे.- समीर पेंडके, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा.