शेतकरी कर्जमुक्तीकरिता काँग्रेसची कचेरीवर धडक
By Admin | Updated: July 11, 2015 02:45 IST2015-07-11T02:45:20+5:302015-07-11T02:45:20+5:30
शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरिता शासन असमर्थ ठरत आहे. दिलेली आश्वासने हवेतच विरत आहेत.

शेतकरी कर्जमुक्तीकरिता काँग्रेसची कचेरीवर धडक
वर्धा : शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरिता शासन असमर्थ ठरत आहे. दिलेली आश्वासने हवेतच विरत आहेत. शेतकरी अनेक समस्यांनी ग्रासला असताना त्याच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप करीत जिल्हा काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाच्या माध्यमातून धडक देण्यात आली. यावेळी एका शिष्टमंडळामार्फत जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
कृषीकर्जाचे पुनर्गठण करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविक, एकाही बँकेत पूर्णत: कर्जाचे गठण झाले नाही. पेरणीच्या वेळी उसणवारी आणत काम निभावण्यात आले. अशात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्याची चिंता वाढत आहे. तरीही राज्य शासनाकडून शेतकऱ्यांकरिता विशेष सहकार्य होत नाही. निवडणुकीच्या काळात कृषी मालाचे दर वाढविण्याचे आश्वासन मोदी शासनाने दिले होते. ते हवेतच विरल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
गोहत्या बंदी कायदा लागू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. यात शेतकऱ्यांकडील भाकड जनावरांचे काय, याचा विचार कायदा करणाऱ्यांकडून झाला नाही. ही जनावरे शेतकऱ्यांनी कुठे न्यावी, दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांचे पोषण शेतकऱ्यांनी कसे करावे याचा विचार करून कायदा अंमलात आणावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. साई मंगल कार्यालयातून निघालेल्या मोर्चात आ. रणजित कांबळे, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रवीण हिवरे, जि.प. माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, विजय जयस्वाल, जि.प. सदस्य उषाकिरण थुटे, मनोज चांदूरकर, मोरेश्वर खोडके, सभापती मनोहर खडसे, उपसभापती गुलाब डखरे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे, सेवादल जिल्हाध्यक्ष प्रकाशचंद्र डफ, पुलगाव नगराध्यक्ष मनीष साहू, शहराध्यक्ष राजेंद्र शर्मा, उपाध्यक्ष इक्राम हुसेन, रमेश सावरकर, अशद उल्ला खान अहमद खान, विवेक इंगाले, नगरसेवक शरद आडेंसह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
तर भाकड जनावरे जिल्हाधिकारी कार्यालयात आणू
शासनाने गोहत्या बंदी कायदा अंमलात आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागात भाकड जनावरांची समस्या येत्या दिवसात डोके वर काढणार आहे. या जनावरांचे काय करावे या बाबत शासनाने विचार करून कायदा अंमलात आणावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास ही भाकड जनावरे जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आणू, असा इशारा यावेळी आ. रणजित कांबळे यांनी दिला.
पोलिसांशी तू.. तू.. मै.. मै..
मोर्चा आंबेडकर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाण्याकरिता निघाला असता न्यायालयाच्या द्वाराजवळ कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. पोलिसांना न जुमानता मोर्चेकर पुढे निघाले. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य द्वाराजवळ पुन्हा पोलिसांशी वाद झाला. यावेळी आ. कांबळे व ठाणेदार बुराडे यांच्या शाब्दिक चकमक झाली. वाद चिघळण्याचे संकेत दिसताच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे यांनी मध्यस्ती केल्याने वाद निवळला.