शेतकऱ्यांचे ‘भीक मांगो’ आंदोलन
By Admin | Updated: February 6, 2016 02:15 IST2016-02-06T02:15:45+5:302016-02-06T02:15:45+5:30
येथील श्रीकृष्ण जिनिंग प्रेसिंगचे मालक सुनील टालाटुले यांनी ४०० शेतकऱ्यांचे आठ कोटी रुपये अजूनपर्यंत दिले नाही.

शेतकऱ्यांचे ‘भीक मांगो’ आंदोलन
आठ कोटी थकीत : जमा झालेले पैसे पाठविले आरएसएसला
सेलू : येथील श्रीकृष्ण जिनिंग प्रेसिंगचे मालक सुनील टालाटुले यांनी ४०० शेतकऱ्यांचे आठ कोटी रुपये अजूनपर्यंत दिले नाही. त्याविरूद्ध आवाज उठविण्यासाठी सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची सभा व सिंदी शहरात भीक मांगो आंदोलन केले. यात शेतकरी, शेतमजूर व विद्यार्थी सहभागी झाले होते.
आरएसएसचा कार्यकर्ता असल्याचे सांगत टालाटुले राज्य व केंद्रातील भाजपा शासनाचा फायदा घेत असल्याचे शेतकरी सांगत आहे. त्याला पाठीराखण करणाऱ्या आरएसएससाठी शेतकऱ्यांनी सदर भीक मांगो आंदोलन करीत हा पैसा आरएसएसला पाठविला. ‘४२० सुनील टालाटुले’ मुर्दाबादच्या घोषणाही शेतकऱ्यांनी यावेळी दिल्या. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ गाणी सादर केली. सिंदी कृउबासच्या परिसरात झालेल्या सभेला राष्ट्रीय प्रभारी किसान खेत मजदूर काँग्रेसचे अविनाश काकडे यांच्यासह अनेकांनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी न्याय मिळवून देण्यासाठी यावेळी सभेत सर्वकष चर्चा झाली. भीकमांगो आंदोलनात किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे, डॉ. नूतन माळवी, डॉ. मोहन सोमलकर, रामनारायण पाठक, सेलू, संदीप चिमुरकर, रामनारायण पटेल, यदुवंश प्रणय, विजेंद्र निशांत आदीसह शेतकरी, विद्यार्थी आदींनी सक्रीय सहभाग घेतला.
सुनील टालाटुले याने ४०० शेतकऱ्यांचे आठ कोटी रूपये अडविल्याने व जिनिंग प्रेसिंगला कुलूप लावल्याने पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पण कापूस उत्पादकांना त्यांचे चुकारे अद्यापन न मिळाल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहे. त्यामुळे सदर भीकमांगो आंदोलन करण्यात आले.(तालुका प्रतिनिधी)