Farmers' back to the Agricultural Festival | कृषी महोत्सवाकडे शेतकऱ्यांची पाठ

कृषी महोत्सवाकडे शेतकऱ्यांची पाठ

ठळक मुद्देनियोजनाचा अभाव : कृषी विभागाकडून दहा लाखांच्या निधीचा होतोय चुराडा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानासह शासनांच्या विविध योजनांची माहिती व्हावी, याकरिता जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून तीन दिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाकडेच जिल्हातील शेतकºयांनी पाठ फिरविल्याने सभामंडपातील खुर्च्या भरण्याकरिता कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचा आधार घ्यावा लागला. जिल्हा परिषद व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला.
स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पोलीस मुख्यालयाख्या मैदानावर १५ जानेवारी ते १७ जानेवारीपर्यंत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाकरिता जिल्हा परिषदेकडून दहा लाखाच्या निधीची उपलब्धता करुन देण्यात आली आहे. या महोत्सवाला शेकºयांची उपस्थिती राहण्याकरिता तालुकानिहाय जनजागृती करणे अपेक्षीत होते. मात्र अधिकाऱ्यांनी जनजागृती न करता आपली जबाबदारी कृषीकेंद्र संचालकांच्या खांद्यावर सोपवून महोत्सवात शेतकरी आणण्यास सांगितले होते. तरीही उद्घाटन समारंभाला शेतकºयांची असमाधानकारकच उपस्थिती दिसून आली. या महोत्सवाच्या परिसरात अनेक स्टॉल लावले असून त्यातील काही स्टॉल रिकामेच आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या नियोजनशुन्य कारभाराचा या महोत्सवाला जबर फटका बसला आहे. विशेषत: दहा लाखांचा निधी उपलब्ध करुन दिल्यानंतर महोत्सवात शेतकऱ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी कृषी विभागाने हिरारीने पुढाकार घेण्याची गरज आहे. पण, खुर्ची राखण्याची वृत्ती आणि कागदी घोडे नाचविले जात असल्याने महोत्सव केवळ औपचारिकताच ठरत आहे.

तंज्ज्ञांकडून रिकाम्या खुर्च्यांना मार्गदर्शन
कृषी महोत्सवात कृषी विषयक तंत्रज्ञान, शेतीसाठी पाण्याचे नियोजन, यात्रिकिकरण आणि इतर अनेक योजनांसंदर्भात प्रात्याक्षिके,कृषी व संलग्न विविध विषयावरील तज्ज्ञाचे मार्गदर्शनही आयोजित केले आहे. आज उद्घाटन समारंभानंतर लगेचच तज्ज्ञांचे मार्गदर्शन सुरु झाले. मात्र यावेळी व्यासपीठासमोर बोटावर मोजण्या इतक्याच व्यक्तींची उपस्थिती होती. ही उपस्थिती पाहून मार्गदर्शकांचाही उत्साह ओसरला होता.

मान्यवरांचीही अनुपस्थिती
तीन दिवसीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते होणार होते. तसेच या कार्यक्रमाला खा. तडस, जि.प. अध्यक्ष सरिता गाखरे, खा. डॉ. विकास महात्मे, आ. नागो गाणार, अनिल सोले, रामदास आंबटकर, रणजित कांबळे, दादाराव केचे, समीर कुणावार, डॉ. पंकज भोयर, जि.प. उपाध्यक्ष वैशाली येरावार, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, सीईओ डॉ. ओम्बासे यांनी उपस्थिती राहणार होती. मात्र खा.तडस, जि.प. उपाध्यक्ष वैशाली येरावार, सीईओ डॉ. सचिन ओम्बासे यांच्याशिवाय कोणीही नियोजित मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.

नवीन तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांनी उन्नती साधावी : खासदार
वर्धा - पारंपारिक शेतीमधून शेतकºयांना मुबलक उत्पादन मिळत नाही. आज शेतकऱ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे होणाºया फायद्याचा अभ्यास करून शेतकºयांनी आपले उत्पन्न वाढवित उन्नती साधावी, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले. मंचावर जि.प. उपाध्यक्ष वैशाली येरावार, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओम्बासे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, कृषी व पशु संवर्धन सभापती मुकेश भिसे, शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी इंगळे, जि.प.माजी अध्यक्ष तथा गटनेते नितीन मडावी, जि.प. विरोधीपक्ष गटनेते संजय शिंदे,आत्माच्या प्रकल्प संचालक विद्या मानकर, कृषीविकास अधिकारी संजय बमनोटे, जि.प.सदस्य पंकज सायंकार, विमल वरभे, केसुताई धनविज उपस्थित होत्या. यावेळी उपाध्यक्ष येरावार, माजी अध्यक्ष मडावी यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सभापती मुकेश भिसे यांनी केले.

कार्यक्रम झाल्यावर आल्या अध्यक्षा
कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे यांची उपस्थिती अपेक्षीत होती. मात्र उद्घाटन समारंभ संपल्यानंतर तब्बल अर्ध्यातासांनी त्या कार्यक्रमस्थळी उपस्थित झाल्याने नव्या अध्यक्षांबद्दल चांगलीच चर्चा रंगली होती. कार्यक्रमानंतर अध्यक्षांना व्यासपीठावर बोलावून जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती मुके श भिसे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

आष्टी तालुक्यातील धाडी येथे ग्रामपंचायत भवनाच्या उद्घाटनासह बंधारा कामाचे लोकार्पण होते. त्यामुळे ग्रामस्थांच्या आग्रहास्तव त्या कार्यक्रमांना जाणे भाग पडले. तेथील सर्व कार्यक्रम वेळेत आटोपून महोत्सवाकरिता निघाल्यावरही रस्त्याअभावी कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास विलंब झाला. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते.
सरिता गाखरे, अध्यक्ष जि.प. वर्धा.

Web Title: Farmers' back to the Agricultural Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.