कृषीपंपांना दिवसा वीज पुरवठ्याकरिता शेतकरी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 23:31 IST2017-12-03T23:31:04+5:302017-12-03T23:31:28+5:30
महावितरणच्यावतीने शेतीपंपाला रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत थ्रीफेज वीज पुरवठा केल्या जातो. त्यामुळे जंगली जनावरांच्या, सापांच्या भीतीने शेतीत रात्री विहिराला पाणी असूनही ओलित करावे लागत आहे.

कृषीपंपांना दिवसा वीज पुरवठ्याकरिता शेतकरी आक्रमक
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : महावितरणच्यावतीने शेतीपंपाला रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत थ्रीफेज वीज पुरवठा केल्या जातो. त्यामुळे जंगली जनावरांच्या, सापांच्या भीतीने शेतीत रात्री विहिराला पाणी असूनही ओलित करावे लागत आहे. यात शेतकºयांचा जीव गेल्यास त्याची जबाबदार महावितरण घेईल काय, असे म्हणत शेतकरी संघटनांच्यावतीने मंगळवारी (५ डिसेंबर) बोरगाव मेघे येथील अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक देण्यात येणार आहे.
खरीप हंगामात अतिपावसान सोयाबीन व गुलाबी बोंड अळीने कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले. रब्बी हंगामात शेतकºयांनी गहु, चना, भाजीपाला आदी पिकांची शेतात लागवड केली. रात्रीच्या वीज पुरवठ्याने शेतकरी ओलीत करू शकत नाही. जर रात्री ओलीत करताना शेतकºयांच्या किंवा शेतीत काम करणाºया मजुराच्या जीवितास हानी झाल्यास याची जबाबदारी वीज मंडळ घेणार काय? हा जाब विचारण्यासाठी व शेतकºयांची अडचण लक्षात घेवून शेतकºयांना कृषी पंपासाठी दिवसा थ्रीफेज वीजपुरवठा करावा. या मागणीसाठी वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने माजी आमदार सरोज काशीकर, शैला देशपांडे, युवा आघाडी अध्यक्ष सतीश दाणी यांच्या नेतृत्वात अधीक्षक अभियंता, कार्यालय बोरगाव(मेघे) येथे शेतकरी धडकणार आहे. या आंदोलनात सहभाग नोंदविणाºया शेतकºयांनी दुपारी १२ वाजेपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा येथे एकत्र यावे असे आवाहन राज्य कार्यकारणी सदस्य मधुसुदन हरणे, जिल्हा प्रमुख उल्हास कोटंबकर, युवा आघाडी अध्यक्ष अरविंद राऊत, उपाध्यक्ष गणेश मुटे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष व जि.प. सदस्य ज्योती गजानन निकम यांनी केले आहे.