‘कॉटन टू क्लॉथ’द्वारे वर्ध्यात शेतकरी महिला उद्योजक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 13:08 IST2018-03-08T13:08:08+5:302018-03-08T13:08:24+5:30
महिला उत्तम शेतकरी असतात याचे दाखले प्राचीन मिस्त्र संस्कृतीत मिळतात. आजवर अनेक महिला शेतकऱ्यांनी ते सिद्धही केले आहे. पण आपणच पिकवलेल्या पांढऱ्या सोन्यावर प्रक्रिया करून साटोडा येथील महिला आता यशस्वी उद्योजक म्हणून पुढे आल्या आहे.

‘कॉटन टू क्लॉथ’द्वारे वर्ध्यात शेतकरी महिला उद्योजक
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महिला उत्तम शेतकरी असतात याचे दाखले प्राचीन मिस्त्र संस्कृतीत मिळतात. आजवर अनेक महिला शेतकऱ्यांनी ते सिद्धही केले आहे. पण आपणच पिकवलेल्या पांढऱ्या सोन्यावर प्रक्रिया करून साटोडा येथील महिला आता यशस्वी उद्योजक म्हणून पुढे आल्या आहे. केवळ उत्पादक न राहता उद्योजक होण्याचा या महिलांचा ध्यास प्रेरणादायक आहे.
कापसाला चांगला भाव मिळवून द्यायचा असेल तर कापसावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारले पाहिजे. या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी कृषी समृद्धी समन्वयीत कृषी विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. याची सुरुवात साटोडा गावापासून झाली. गावातील १६ महिलांनी कापसापासून खादी कापड तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली. यातून त्यांना रोजगाराचे नवीन साधन उपलब्ध झाले. कॉटन टू क्लाथ ही संकल्पना साकारणारा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा आहे.
विदर्भात आपूस हे प्रमुख पीक आहे. पण शेतकऱ्यांना कापूस हा कच्चा माल म्हणून विकावा लागतो. कारण येथे शेतकऱ्यांच्या मालकीच्या सूतगिरण्या किंवा वस्त्रोद्योग नाहीत. शेतात पिकवलेला कापूस व्यापाऱ्यांना मिळेल त्या भावाने देण्याशिवाय पर्याय नसतो. वषार्नुवर्षे सुरू असलेली प्रथा आजही कायम आहे. या परिस्थितीत बदल घडविण्यासाठी केम प्रकल्प स्थापन केला. यातून शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योगाकरिता मार्गदर्शन केले जाते. याचाच लाभ या महिलांनी घेतला. मागील दोन वर्षांपासून दहा गावातील शेतकरी प्रशिक्षण घेऊन स्वत:च कापूस गाठी तयार करतात आणि नंतर विक्री होते. पण यातील नफ्याचे खरे गणित कापड आणि वस्त्रे तयार करण्यात आहे ही बाब लक्षात घेऊन कॉटन टू क्लाथ या संकल्पनेवर काम करण्यास सुरुवात केली. वर्धा शहरालगतच्या साटोडा येथील विठाई, संस्कृती, महालक्ष्मी, भिमाई या महिला बचत गटाच्या २० महिलांनी हातमाग चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. मुख्य म्हणजे यातील महिला या शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील आहेत. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विधायक कृतिशील कायार्पासून प्रेरणा घेऊन निवेदिता मिलयम ही संस्था कार्य करते. या संस्थेचे किशोरभाई यांनी शेतकरी महिलांना हातमाग चालविण्याचे प्रशिक्षण दिले. तसेच हातमाग युनिटही तयार करून दिले. केमने ३० टक्के अनुदानावर चार हातमाग युनिट या गावात स्थापन केले. त्यामुळे महिलांना उद्योजक होण्यास हातभार लागला.
दोन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर आॅगस्ट २०१७ पासून १६ महिलांनी ५०० मीटर खादी कापड तयार केले आहे. मुख्य म्हणजे समन्वित शेतकरी उत्पादक कंपनी आणि ग्लोबल इंटरप्रयजेस या कंपनीसोबत तयार कापड विकण्याचा करार केल्यामुळे १५० रुपये प्रति मीटरने खादी कापड विकला जात आहे. यातून महिलांना २०० रुपये प्रतिदिन मजुरी सोबतच कापड विक्रीतून होणाºया नफ्यातील हिस्साही मिळणार आहे. याच गावात आणखी आठ हातमाग युनिट लवकरच बसविण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प संचालकांनी दिली. त्यामुळे अधिक महिलांना रोजगाराची संधी गावातच उपलब्ध होणार आहे. शिवाय गावातील शेतकऱ्यांना या हंगामात कापूस व्यापाऱ्यांना विकण्याची गरज भासणार नाही. थेट कापड तयार करून विक्रीचा पर्यायही महिलांनी उपलब्ध आहे.