कृषी विरोधी सरकारी धोरणामुळेच शेतकरी आत्महत्या
By Admin | Updated: October 21, 2016 02:04 IST2016-10-21T02:04:34+5:302016-10-21T02:04:34+5:30
शासकीय आकडेवारीप्रमाणे गत १५ वर्षांत देशभरात शेती परवडत नाही, शेतीत नफा मिळत नाही,

कृषी विरोधी सरकारी धोरणामुळेच शेतकरी आत्महत्या
जानराव नागमोते : किसान सभेचा कारंजा (घा.) तालुका शेतकरी मेळावा
कारंजा (घा.) : शासकीय आकडेवारीप्रमाणे गत १५ वर्षांत देशभरात शेती परवडत नाही, शेतीत नफा मिळत नाही, शेतीला लागणारे बियाणे, रासायनिक खते, किटनाशके, शेतमजुराची मजुरी, जीवन जगण्याचा खर्च वाढला. यामुळे शेतीचा लागत खर्च वाढला. निघालेला शेतमाल विकून गुंतविलेली रक्कम वसूल होत नाही. यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडून आत्महत्येकडे वळला. शेतकरी आत्महत्यांना केंद्र-राज्य सरकारचे शेतकरी विरोधी धोरणच कारणीभूत आहे, असे मत किसान सभेचे जिल्हा सचिव जाणराव नागमोते यांनी व्यक्त केले.
किसान सभेद्वारे तालुका शेतकरी मेळावा गुरूदेव मठ सभागृहात घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गुरूदेव सेवा मंडळाचे परसराम जसुतकर, प्रतिष्ठित नागरीक नाना जाधव उपस्थित होते. मार्गदर्शक म्हणून किसान सभेचे यशवंत झाडे, चंद्रभान नाखले, माकपाचे महेश दुबे, बांधकाम कामगार संघटनेचे गजू ढोरे, जिल्हाध्यक्ष अनिल चव्हाण आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना स्वामीनाथन शेतकरी आयोगाच्या शिफारशीप्रमाणे दरवर्षी हमीभाव आणि त्यात हमीभावाच्या ५० टक्के नफा जोडून सर्व प्रकारचे शेतमालाचे हमीभाव केंद्र सरकारने जाहीर करावे. त्यात दरवर्षी वाढत्या महागाई निर्देशांकाप्रमाणे वाढ करावी. जाहीर केलेले हमीभाव शेतकऱ्यांना बाजारपेठेत मिळतील, अशी व्यवस्था शासनाने करावी. त्याशिवाय शेतकरी सुखी होऊ शकणार नाही, असे मत किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष यशवंत झाडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी चंद्रभान नाखले, महेश दुबे, अनिल चव्हाण आदींनी विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन संजय देशमुख यांनी केले तर उपस्थितांचे आभार जयश्री बागडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता दामोधर कौरती, महादेव देशमुख, माधवराव मडावी, अशोक पुरी, धर्माजी अंबुडारे, गुरूदत्त बारंगे, सुभाष बागडे, छत्रपाल चोपडे, रमेश उईके, जगदीश बैस, मालती चाफले, सुनीता नायर, शेख मोईउद्दीन, दिलीप शेंडे आदींनी सहकार्य केले. मेळाव्यात तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी)