प्रकल्पाच्या पाण्याने शेतकरी त्रस्त
By Admin | Updated: November 11, 2015 01:27 IST2015-11-11T01:27:37+5:302015-11-11T01:27:37+5:30
परिसरात पोथरा प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था केली आहे.

प्रकल्पाच्या पाण्याने शेतकरी त्रस्त
पाटसऱ्यांची दुरवस्था : पाणी रस्त्यावर येत असल्याने वहीवाटीत अडथळा
नारायणपूर : परिसरात पोथरा प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था केली आहे. परंतु अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार धोरणामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. मुख्य कालव्यावरून खांबाडा वितरिका क्रमांक २ चे पाणी पाटसऱ्या साफ नसल्याने व मार्गावरील पूल खचल्याने येण्या जाण्याचा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे पाटसऱ्या स्वच्छ करून रस्त्यावर येत असलेल्या पाण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील बाधित शेतकरी करीत आहे.येथील शेतकरी दिनेश वैद्य, प्रमोद मानकर यांनी याबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर केले.
वास्तविक पाहाता सिंचन विभागातील अभियंत्यांद्वारे व उपवितरका, पाटसऱ्या साफ करुनच पाणी सोडणे अनिवार्य असते. पण कोणत्याही प्रकारची स्वच्छता न करता धरणातील पाणी सोडण्यात आल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. पाटसऱ्यांतील पाणी रस्त्यावर जमा होऊन तळे साचत आहे. त्यामुळे वहीवाटीस अडथळा निर्माण होऊन शेतीतील कामे खोळंबली आहे. पाण्यामुळे शेतमाल घरी आणनेही कठीण झाले आहे.
याबाबत शेतकरी तक्रार करीत असल्याने शाखाधिकारी पानवटकर यांनी सदर प्रभावित जागेची पाहणी केली. पण निधी नसल्यामुळे काम करणे कठीण होत असल्याचे त्यांनी सांगितले. शासन सिंचनाकरिता कोट्यावधी रुपये खर्च करीत आहे. पण सिंचन विभागाकडे तरीही निधी प्राप्त होत नसल्याचे अधिकारी सांगतात. परंतु शेतकरी सदर बाबा अमान्य करीत सिंचन विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे.तसेच विभागाच्या उदासीन धोरणामुळे संताप व्यक्त करीत आहे.(वार्ताहर)