कौटुंबिक वादातून महिलेने जाळून घेतले
By Admin | Updated: July 25, 2015 02:17 IST2015-07-25T02:17:19+5:302015-07-25T02:17:19+5:30
कौटुंबिक कलहातून महिलेने जाळून घेतल्याची घटना गुरुवारी रात्री नजीकच्या हेटी येथे घडली.

कौटुंबिक वादातून महिलेने जाळून घेतले
आकोली: कौटुंबिक कलहातून महिलेने जाळून घेतल्याची घटना गुरुवारी रात्री नजीकच्या हेटी येथे घडली. यात सदर महिला ७५ टक्के भाजल्या गेली. महिलेला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे. शितल गजानन भंडारे (२५) असे महिलेचे नाव आहे.
जेमतेम परिस्थिती असल्याने सदर महिला शेतमजुरीचे काम करीत होते. गुरुवारी गावाचा आठवडी बाजार असल्याने तिला मजुरीचे पैसे मिळाले. सदर रक्कमेची तिच्या पतीने मागणी केली. यावरून दोघांत कडाक्याचे भांडण झाले. यापूर्वीही या दोघांत असेच वाद झाल्याची माहिती आहे. या वादात रागाच्या भरात शितल हिने अंगावर रॉकेल घेत जाळून घेतले. तिने जाळून घेतले त्यावेळी तिचा पती घरीच होता. मात्र त्याच्याकडून तिच्या बचावाकरिता विशेष प्रयत्न करण्यात आले नाही. यात सदर महिला ७५ टक्के भाजल्या गेली.
परिसरातील नागरिकांनी तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. सदर महिलेला दीड वर्षाचा मुलगा आहे.(वार्ताहर)