कुटकीच्या पुलावरील कठडे भग्न

By Admin | Updated: October 21, 2015 02:22 IST2015-10-21T02:22:06+5:302015-10-21T02:22:06+5:30

तालुक्यातील कुटकी ते तळोदी या दोन गावांच्या मधोमध धाम नदी वाहते. या नदीवर २००९ मध्ये पुलाचे बांधकाम करण्यात आले.

False fracture on the bridge of kutki | कुटकीच्या पुलावरील कठडे भग्न

कुटकीच्या पुलावरील कठडे भग्न

दुरूस्तीची प्रतीक्षा : तुटलेल्या कठड्यांमुळे अपघातांचा धोका
वर्धा : तालुक्यातील कुटकी ते तळोदी या दोन गावांच्या मधोमध धाम नदी वाहते. या नदीवर २००९ मध्ये पुलाचे बांधकाम करण्यात आले. सदर पुलावर कठडेही बसविण्यात आले होते; पण काहीच दिवसांत कठड्यांची दुरवस्था झाली. या कठड्यांची दुरूस्ती गरजेची असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचेच दिसून येत आहे.
वर्धा तालुक्यातील हमदापूर ते सेलू या मार्गावरील कुटकी व तळोदी या दोन गावांच्या मधून धाम नदी वाहते. रहदारी सुलभ व्हावी म्हणून २००९ मध्ये या नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात आले. २ कोटी ३२ लाख ५० हजार रुपयांचा खर्च करून आठ मिटर उंच पुलाची निर्मिती करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर पुलाचे काम पाच महिन्यांत पूर्ण करण्यात आले. या पुलावरील कठडे सध्या ध्वस्त झाले आहेत. वाहनांच्या धडकांमुळे पुलाचे कठडे तुटले आहेत. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. हमदापूर परिसरातील नागरिक सेलूला जाण्याकरिता कुटकी-तळोदी मार्गाचा अवलंब करतात. यामुळे रहदारी अधिक असते. पावसाळ्यात नदीला पूर असल्यावर या पुलावरून ये-जा करावी लागते. कधी तर पुलावरूनही पाणी वाहत असते. दरम्यान, पुलावरून जर कुणी गेले तर वाहून जाण्याची शक्यता बळावली आहे. याबाबत ग्रामस्थांकडून तक्रारी करण्यात आल्या; पण अद्याप पुलाची दुरूस्ती करण्यात आली नसल्याचेच दिसून येते.(कार्यालय प्रतिनिधी)

पाईप व अँगल्स वाकलेले
या पुलाला लावलेले पाईप आणि अँगल्स वाकलेल्या स्थितीत आहेत. यामुळे येथे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. पुलावरील काही भागातील अँगल्स तर बेपत्ता झाले आहेत. काही पाईपही चोरीस गेल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देत कठड्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

अँगल्स निसटण्याची भीती
पुलाला लावण्यात आलेले काही अँगल्स चोरी गेले. पुलाला नट बोल्टच्या साह्याने अडकून असलेले अँगल्सही निसटण्याच्या बेतात आहेत. काही ठिकाणी पाईपही झुलत आहेत. अँगल्सही पाण्याच्या दिशेने वाकले आहेत. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

दिवसभर सुरू असते रहदारी
कुटकी-तळोगदी या मार्गावर दिवसभर रहदारी सुरू असते. याच मार्गाने सेलू ते हमदापूर वाहतूक होते. हा मार्ग सेलू येथून हमदापूर आणि सेवाग्राम येळे जाण्यासाठी जवळचा आहे. यामुळे अनेक वाहने याच मार्गाने हमदापूर वा सेवाग्रामला जातात. रहदारीच्या दृष्टीने हा रस्ता महत्त्वाचा आहे.

बांधकाम विभागाने दखल घेणे गरजेचे
हमदापूर ते सेलू हा रहदारीचा मार्ग असल्याने धाम नदीवरील पूल सुस्थितीत असणे गरजेचे आहे. याच पुलाचे कठडे तुटलेल्या अवस्थेत आहे. वाकलेले पाईप, अँगल्सही चोरीला जात आहेत. यामुळे रहदारीच धोक्यात आली आहे. या पुलावरून रात्री-बेरात्री वाहतूक होते; पण कठडे भग्न असल्याने रात्री ये-जा करणे कठीण आहे.बांधकाम विभागाने याची दखल घेणे गरजेचे आहे
याबाबत बांधकाम विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र होऊ शकला नाही.

Web Title: False fracture on the bridge of kutki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.