१९ जणांविरोधात दोषारोपपत्र

By Admin | Updated: May 27, 2016 01:53 IST2016-05-27T01:53:23+5:302016-05-27T01:53:23+5:30

शहरात १७ वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळात नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरविण्यात आले होेते.

False charges against 19 people | १९ जणांविरोधात दोषारोपपत्र

१९ जणांविरोधात दोषारोपपत्र

वर्धा पालिकेचा पाणी घोटाळा : एसीबीकडून चौकशी पूर्ण
वर्धा : शहरात १७ वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळात नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरविण्यात आले होेते. यावेळी पालिका व काही कंत्राटदार अशा एकूण १९ जणांनी संगनमत करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबधंक विभागाच्यावतीने चौकशीत समोर आले. या प्रकरणी तयार करण्यात आलेले दोषारोपपत्र वर्धा न्यायालयात गुरुवारी पोहोचले; मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे ते दाखल करण्यात आले नाही. या प्रकरणी ९ जून ही तारीख देण्यात आल्याची माहिती न्यायालयीन सुत्रांनी दिली.
याचिका दाखल करण्यात येणार असल्याने या प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. यामुळे यातील काही आरोपी न्यायालयात हजर झाले होते; मात्र त्यांना पुढची तारीख देण्यात आली आहे. या प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानंतर काहींना अटक करण्यात आली होती. तर काहींना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता. १७ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर या प्रकरणी दोषारोपपत्र न्यायालयात पोहोचल्याने यात उल्लेख असलेल्या सर्वच आरोपींचे धाबे दणाणले आहे.
या प्रकरणात तत्कालीन तहसीलदार मधुकर चामलवार (सेवानिवृत्त), वर्धा पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी शशिमोहन नंदा, तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. चंद्रशेखर खडसे, सुनीता इथापे, स्वास्थनिरीक्षक रविंद्र टप्पे, सेवानिवृत्त लेखापाल नारायण चरडे, लेखापाल हरिभाऊ सरोदे, लिपिक तिरथ श्यामलाल सुवाडोर, लिपिक पुण्यदास चरडे, लिपिक नरेश नंदरधने, कंत्राटदार भवरदास दयालमल भाटीया, दीपक रमणलाल लालवाणी, दिनेश शर्मा, दिनेश तुकाराम रहाटे, आशा ब्रिजलाल गायकवाड, अजय नामदेव हेडाऊ, तत्कालीन उपाध्यक्ष सुरेश ठाकरे, नरेंद जगदळे यांच्यासह चंदा भोयर यांची नावे आहेत. यातील १८ जणांना नोटीस बजावण्यात आली असून चंदा भोयर या मिळून आल्या नसल्याचे सांगण्यात आले आहे.
दोषारोपपत्रात उल्लेख असलेल्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१) (क), सहकलम १३ (१) तसेच भादंविच्या ४६८, ४७१, ४७७ (अ), १०९ व ३४ कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.(प्रतिनिधी)

लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेच तयार केले पाच हजार पानांचे दोषारोेपपत्र
वर्धा पालिकेकडून झालेल्या या अपहाराची तक्रार केल्यानंतर नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात आली. यात एकूण १९ जणांना आरोपी करण्यात आले. त्यांच्या विरोधात विभागाच्यावतीन एकूण पाच हजार पानांचे दोषारोपपत्र तयार केले आहे. हा पूर्ण गठ्ठा त्यांच्यावतीने न्यायालयात पाठविण्यात आला आहे. या दोषारोपपत्रात प्रत्येकाने या घोळांत बजावलेली भूमिका विषद केली आहे. त्याने केलेल्या कार्याचा पूर्ण लेखाजोखा या दोषारोपपत्रात असल्याची माहिती सुत्रांनी दिली. हे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल होण्याकडे अनेकांच्या नजरा आहेत.

असा झाला भ्रष्टाचार
वर्धा शहरात सन १९९९ मध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. नागरिकांना पाणी पुरविण्याकरिता निविदा काढण्यात आली. पाणी पुरविण्याचा हा कंत्राट पालिकेतील काही नगरसेवकांसह त्यांच्या नातलगांनी बळकावला. नागरिकांना पाणी पुरविण्याकरिता असलेल्या एका टँकरने एका तासात थोड्या थोडक्या नाही तर २ हजार ९३५ फेऱ्या केल्याची नोंद देयके काढताना करण्यात आली. पाण्याच्या कंत्राटाकरिता पालिकेतून एकूण १४ लाख २१ हजार २८९ रुपयांची देयके मंजूर करण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीवरून नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांनी चौकशी केली. या चौकशीत प्रकरणात एकूण २१ जणांचा समावेश असल्याचे समोर आले. यातील १९ जणांना आरोपी करण्यात आले तर दोघांविरूद्ध विशेष पुरावा नसल्याने त्यांना प्रकरणातून बाहेर ठेवण्यात आल्याची माहिती न्यायालयीन सुत्रांनी दिली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने केलेल्या चौकशीत पालिकेच्यावतीने पाणी पुरवठ्याची देयके देताना एकूण १४ लाख २१ हजार २८९ रुपयांची देयके मंजूर करण्यात आल्याचे समोर आले. यात तब्बल ७ लाख ९६ हजार ३०९ रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले.

Web Title: False charges against 19 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.