वाहतूक सुरक्षा पंधरवड्यावर असुविधांचे सावट

By Admin | Updated: January 10, 2016 02:32 IST2016-01-10T02:32:32+5:302016-01-10T02:32:32+5:30

उप प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक शाखेच्यावतीने शासनाच्या आदेशानुसार रविवारपासून शहरात सुरक्षित वाहतूक पंधरवडा राबविण्यात येत आहे.

Failure to traffic safety fortnight | वाहतूक सुरक्षा पंधरवड्यावर असुविधांचे सावट

वाहतूक सुरक्षा पंधरवड्यावर असुविधांचे सावट

साधनांअभावी अंमलबजावणीत अडचणी : वाहतूक नियंत्रण दिव्यांची माहिती कागदावरुनच
वर्धा : उप प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक शाखेच्यावतीने शासनाच्या आदेशानुसार रविवारपासून शहरात सुरक्षित वाहतूक पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवड्यात वर्धेकरांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्यात येणार आहे; मात्र शहरात सिग्नलसह इतर सुविधा नसल्याने नागरिकांना माहिती देताना पोलीस विभागाची अडचण होणार असल्याचे दिसते. पालिकेडून आवश्यक सुविधा उपलब्ध होत नसल्याने वर्धेत या पंधरवड्यावर असुविधांचे सावट आहे. यामुळे हा पंधरवडा वर्धा शहरात केवळ नावापुरताच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वाहतुकीच्या नियमांची सर्वसामान्यांना ओळख होण्याकरिता या पंधरवड्यात विशेष प्रयत्न करण्यात येतात. याकरिता संबंधीत विभागाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यात वर्धेत मात्र पालिकेच्यावतीने शहर वाहतूक पोलिसांना आवश्यक असलेल्या सुविधा पुरविण्यात सदैव असमर्थता दर्शविण्यात आल्याने त्यांची गोची होत आहे. शहरातील अनियमित वाहतूक नियमित करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत यावर मार्ग काढण्याकरिता आर्वी नाका, बजाज चौक या वर्दळीच्या ठिकाणी पालिकेच्यावतीने लोखंडी कठडे लावावे, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. पालिकेने या संदर्भात कुठलीही कारवाई केली नसल्याने वाहतूक पोलीस विभागाच्यावतीने दारूबंदीच्या ‘वॉश आऊट’ मोहिमेत जप्त केलेल्या ड्रमच्या सहायाने वाहतुकीला वळण लावण्याचा प्रयत्न केला.
बजाज चौक, आर्वी नाका व साईमंदिर चौकातील वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने झालेला हा प्रयत्न यशस्वी झाल्याचे दिसत आहे. शहरातील मोठा चौक म्हणून उदयास येत आलेल्या आर्वी नाका चौकात मध्यभागी या ड्रमचा वर्तुळ तयार करण्यात आल्याने येथे वाहतुकीला वळण आल्याचे दिसून आले आहे.
रविवारपासून वाहतूक पंधरवडा सुरू होत आहे. या १५ दिवसात वाहतूक शाखेसह उप प्रादेशिक परिवह विभागाच्यावतीने मोहीम राबवित आहे. या दिवसात वाहतूक जनजागृतीकरिता विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात वाहतुकीचे नियम सांगण्याकरिता सुविधाच उपलब्ध नसल्याचे शहरातील वास्तव आहे. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.(प्रतिनिधी)

पीवन-पीटू बेपत्ता
बाजार परिसरात दुकानांसमोर दोन्ही वाहने उभी राहत असल्याने वाहतूक विस्कळीत होत होती. यावर मार्ग काढून एका दिवसाआड एका बाजूला पार्किंग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावर काही दिवस अंमलबजावणी झाली, मात्र कालांतराने त्याचाही फज्जा उडाल्याचे दिसून आले. आजच्या स्थितीत येथे दोनही बाजूने वाहने उभी राहत आहे. तर दुकानदारांच्या अतिक्रमणाने रस्ते अरूंद होत आहे.
पालिकेच्यावतीने यावर मार्ग काढण्याकरिता मोहीम राबविण्यात आली. ती मोहीम केवळ दिखावा ठरली. काही व्यापाऱ्यांनी आवाज उठविताच पालिकेची मोहीम हवेतच विरली. यामुळे बाजारातील रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे येथून पायी चालनेही कठीण झाल्याचे दिसते आहे.

शहरातील सिग्नलही बंदच
शाळकरी मुलांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्याकरिता लाल, पिवळा व हिरवा दिवा महत्त्वाचा आहे. वर्धा शहरात त्याची व्यवस्था नाही, असेही नाही. केवळ अव्यवस्थेमुळे ते आज बंद पडले आहेत. यामुळे शहरातील विद्यार्थ्यांना केवळ कागदावरच माहिती देण्याची वेळी वाहतूक शाखेच्या पोलिसांवर आली आहे.
रस्ता ओलांडतांना झेब्रा क्रॉसिंगची पद्धत आहे. शहरात मात्र तसे पट्टे कुठेही कोणत्याही रस्त्यावर नसल्याचे दिसते. कोणत्याही शाळेजवळ वाहतूक पोलीस उभे राहत नसल्याचे दिसते. या १५ दिवसांत या समस्यांवर मार्ग काढण्याकरिता काही विचारमंथन होण्याची गरज वर्तविली जात आहे.

नियमावलीची पुस्तके
या पंधरवड्यात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सर्वसामान्यांना सुरक्षित वाहतुकीसंदर्भात नियमांची माहिती देण्यात येत आहे. वर्धेतील शाळा महाविद्यालयात राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देणारी पुस्तिका देण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवह अधिकारी विनोद जिचकार यांनी दिली.
पंधरवड्यात तरी ‘नो एन्ट्री’ची अंमलबजावणी होईल ?
शहरातील वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने काही रस्त्यांवर एकतर्फी वाहतूक करण्यात आली. तसे फलकही लावण्यात आले आहे. मात्र त्याची कुठलीही अंमलबजावणी करण्यात येत नसल्याचे दिसून आले आहे. या नो एन्ट्रीतूनच एन्ट्री होत असल्याचे दिसून आले आहे. या सुरक्षा पंधरवड्यात तरी त्याची अंमलबजावणी होईल काय असा सवाल वर्धेकरांच्यावतीने करण्यात येत आहे.

Web Title: Failure to traffic safety fortnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.