विदर्भातील पर्यटन विकासासाठी भरगच्च तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 13:18 IST2017-11-04T13:13:26+5:302017-11-04T13:18:15+5:30
पर्यटनस्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास राज्य सरकारकडून सन २०१६-१७ मध्ये मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्यात आला आहे.

विदर्भातील पर्यटन विकासासाठी भरगच्च तरतूद
आॅनलाईन लोकमत
वर्धा : पर्यटनस्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास राज्य सरकारकडून सन २०१६-१७ मध्ये मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्यात आला आहे. यातून विदर्भाच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांचा या आराखड्यात समावेश आहे.
पर्यटन स्थळाच्या क्षेत्रात पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सन २०१६-१७ मध्ये २०० कोटी इतक्या निधीचे नियतव्यय अर्थसंकल्पित करण्यात आले होते. त्यापैकी ८० टक्के रक्कम म्हणजे १६० कोटी रूपये वितरणास उपलब्ध झाले. त्यानंतरही विविध पर्यटन क्षेत्रासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात विदर्भात वर्धा जिल्ह्याच्या केळझर येथील विकासासाठी तसेच नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील रायपूर, वेणा नदी, अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथील मोझरी पॉर्इंट, हॉलिडे रिसॉर्ट व साहसी क्रीडा संकूल उभारणी या शिवाय यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे भंडारा जिल्ह्याच्या चांदपूर, गायमुख, चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा (मोहर्ली) येथील पर्यटन निवासाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब, उमरखेड तालुक्यातील सहस्त्रकुंड, टिपेश्वर, संकटमोचन तलाव, वर्धा जिल्ह्यातील बोरधरण आदी ठिकाणीही या निधीतून विविध पर्यटन सोयी निर्माण केल्या जाणार आहेत. याशिवाय धुळे जिल्ह्यात वर्णेश्वर शिवमंदिर, जुने कोळदे, प्राचीन काली मंदिर, मेथी ता. शिंदखेड, विखरण, चामुंडेश्वरी माता मंदिर आदीच्या विकासासाठी तरतूद करण्यात आली आहे. औरंगाबाद, रायगड, ठाणे, कोल्हापूर, नाशिक येथीलही पर्यटन विकासाच्या कामांचा यात समावेश आहे.
केळझरात साधला जाणार त्रिवेणी संगम
विदर्भाचा अष्टविनायक म्हणून प्रसिध्द असलेल्या सिध्दीविनायक गणेश मंदिराच्या केळझर नगरीत पर्यटन विकास महामंडळाने हजरत पीर बाबा टेकडी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्मभूमी व सिध्दीविनायक परिसर विकास कामासाठी ४९५ कोटी रूपयाचा निधी उपलब्ध केला आहे. यातून हिंदू, मुस्लीम, बौध्द या तीनही धर्माच्या स्थळांशी निगडीत परिसराचा विकास होणार आहे. या भागातून समृध्दी महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने या परिसराच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.