विस्तारीकरण करा, पण पर्यावरण जपा

By Admin | Updated: June 25, 2015 02:14 IST2015-06-25T02:14:15+5:302015-06-25T02:14:15+5:30

पर्यावरणाचा समतोल राखून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन दिल्यास भुगाव येथील मे. उत्तम व्हॅल्यू स्टील्स कंपनीच्या विस्तारीकरणाला कुठलाही विरोध असणार नाही, ....

Extend, but savor the environment | विस्तारीकरण करा, पण पर्यावरण जपा

विस्तारीकरण करा, पण पर्यावरण जपा

उपस्थितांचा सूर : उत्तम व्हॅल्यू स्टील्स कंपनीच्या विस्तारीकरणाबाबत पर्यावरण जनसुनावणी
वर्धा : पर्यावरणाचा समतोल राखून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन दिल्यास भुगाव येथील मे. उत्तम व्हॅल्यू स्टील्स कंपनीच्या विस्तारीकरणाला कुठलाही विरोध असणार नाही, असा सूर उपस्थित नागरिकांनी काढला.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नागपूरच्यावतीने येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर मे. उत्तम व्हॅल्यू स्टील्स कंपनीच्या प्रस्तावित क्षमता १.० दशलक्ष ते २.० दशलक्ष टन प्रतिवर्ष विस्तारीकरणावर बुधवारी पर्यावरण विषयक जनसुनावणी घेतली. अध्यक्षस्थानी निवासी जिल्हाधिकारी वैभव नावडकर होते. मंचावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी अनिल मोहेकर व संयोजक किरण हसबनीस विराजमान होते. आक्षेपावरुन शाब्दिक रणकंदन झाले, मात्र विस्तारीकरणाला कुणीही विरोध दर्शविला नाही.
वणा नदीचे पाणी कंपनीला देणार नाही, अशी भूमिका माजी आमदार राजू तिमांडे, हिंगणघाट येथील वणा नदी बचाओ संघर्ष समितीच्या वतीने दिवाकर गमे, आपचे मनोज रुपारेल व प्रमोद भोयर, लोक जनशक्ती पार्टीचे संतोष तिमांडे, दीपक माडे, आफताब खान, नारायण राखुंडे यांनी मांडताना कंपनीच्या विस्तारीकरणाला विरोध नसल्याचे स्पष्ट केले. तिमांडे यांनी कंपनीला पाणी देण्याचा प्रस्ताव रद्द करावा, हिंगणघाटातील उद्योग, शेती, शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. तेव्हा वणाचे पाणी घेऊ नये, असेही मत नोंदविले. गमे यांनी कागदपत्रे दाखवून वणाचे पाणी देण्यास विरोध दर्शविला. हे सांगताना त्यांनी जलसंपदा, पाटबंधारे विभागावर भ्रष्टाचाराचा आरोप केला.
संदीप किटे, पवनारचे सरपंच राजेश्वर गोंढाळे, बाळा माऊसकर, लहान आर्वीचे कपिल खोडे, इंझापूरचे दीपक तपासे यांच्यासह अन्य काही नागरिकांनी पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, अशी भूमिका मांडताना विस्तारीकरणाला विरोध नसल्याचेही सांगितले.
वर्धेचे उपनगराध्यक्ष कमल कुलधरीया, माजी जि.प. अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, एमआयडीसी वर्धाचे अध्यक्ष व काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव प्रवीण हिवरे, हैद्राबादचे पर्यावरण तज्ज्ञ सुनांदा रेड्डी, रिपाइंचे विजय आगलावे, अख्तर खान, नरेंद्र लोणकर, मकरंद पाठक, चितोडा सरपंच राजकुमारी चक्रधर उपाध्याय, साटोडाचे सदस्य अजय जानवे, नवीन चौधरी, अ‍ॅड. अनिता ठाकरे, भुगावचे सरपंच राजू नाखले यांनी कंपनीच्या विस्तारीकरणाला जाहीर समर्थन दर्शविले. शेखर शेंडे यांनी विस्तारीकरणाला समर्थन दर्शवित महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कामातच पारदर्शकता नसल्यामुळे अशा जनसुनावणी घेण्याची गरज पडते, असेही मत मांडले. प्रवीण हिवरे म्हणाले, वर्धेत एकही कारखाना नसल्यामुळे बरोजगारीचा प्रश्न बिकट आहे. ही बाब लक्षात घेऊन तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी हे सेवाग्रामला आले असता संरक्षक कठडे तोडून त्यांची भेट घेतली व वर्धेत उद्योगाला परवानगी द्यावी, अशी मागणी केली. त्यावेळी गुन्हेही दाखल झाले होते. वर्धेत कारखाना यावा म्हणून आंदोलन झाले. आता त्याच्या विस्तारीकरणाला विरोध असण्याचे कारण नसल्याची बाबही त्यांनी स्पष्ट केली. ज्ञानेश्वर ढगे यांनी बेरोजगारीची समस्या लक्षात घेता कारखान्याच्या विस्तारीकरणाचा विरोध करण्याचे कारण नसल्याचे सांगून जाहीर समर्थन दर्शविले. सर्वप्रथम उत्तम व्हॅल्यू कंपनीने प्रस्तुतीकरणातून कंपनीच्या विस्तारीकरणाची प्राजेक्टरद्वारे सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. यावेळी खासदार रामदास तडस, आ. रणजित कांबळे, आ. पंकज भोयर यांनी पत्र पाठवून विस्तारीकरणाला समर्थन केले.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Extend, but savor the environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.