ग्रामीण भागातील बँक शाखेचा विस्तार करा
By Admin | Updated: August 5, 2015 02:09 IST2015-08-05T02:09:46+5:302015-08-05T02:09:46+5:30
येथे एक राष्ट्रीयकृत बँकेची शाखा आहे. त्याला परिसरातील सर्व गावे जोडण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील बँक शाखेचा विस्तार करा
ग्राहकांची होते ताटकळ : कार्यालयासमोर लागतात रांगा
खरांगणा (मो.) : येथे एक राष्ट्रीयकृत बँकेची शाखा आहे. त्याला परिसरातील सर्व गावे जोडण्यात आली आहे. त्यामुळे या बँकेच्या कार्यालयात ग्राहकांची मोठी गर्दी होऊन कोंडी पाहायला मिळते. सध्या शेतीचा हंगाम असल्याने शेतकऱ्याना पीक कर्जाकरिता येथे वारंवार यावे लागते. याशिवाय विविध योजनेतील लाभार्थी यांची संख्या अधिक असल्याने येथे बँक कार्यालयासमोर ग्राहकांच्या रांगा लागतात. ग्रामीण भागातील शाखेचा विस्तार करण्याची मागणी परिसरातील ग्राहकांनी केली आहे.
याचा सर्वाधिक फटका वृद्धांसह विद्यार्थ्यांना बसत सहन करावा लागत आहे. याप्रकाराने वेळ आणि श्रम याचा अपव्यय होत आहे. यामुळे ग्रामस्थांत संतापाचे वातावरण आहे. खरांगणा (मोरांगणा) हे गाव जवळपास दहा हजार लोकसंख्येचे आहे. येथील बँकेसोबत परिसरातील २५ ते ३० गावाचा संपर्क येतो. येथे बँक आॅफ इंडिया, एचडीएफसी या बँक शाखेसह को-आॅपरेटिव्ह बँकेचीसुद्धा शाखा होती. परंतु बँक डबघाईस आल्याने येथील शाखा बंद करण्यात आली. त्यामुळे आता केवळ एक राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेवर हजारो ग्राहकांचा ताण पडला आहे. त्यामुळे कामकाज प्रभावित होते.
विविध योजना बँकेच्या माध्यमातून जोडण्यात आल्या आहे. त्यामुळे ग्राहक संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अधिकाधिक ग्राहक राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेशी जोडले आहेत. असे असले तरी ग्राहकांचा व्याप पाहता राष्ट्रीकृत बँक शाखांचा त्या प्रमाणात विस्तार झाला नाही. याबाबत संबंधित व्यवस्थापनाकडून कोणत्याही हालचाली होताना दिसत नसल्याने ग्राहकांची कोंडी होत आहे.
येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते. शेतकरी, विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचारी व शिक्षकांसह इतर शासनाच्या योजनांचा लाभ घेणारे लाभार्थी रांगेतच थांबतात. त्यातही वारंवार लिंक फेल होत असल्याने काम स्थगित होते. त्यामुळे ग्राहकआंची ताटकळ वाढते. ग्राहकांची होत असलेली गैरसोय आणी परिस्थिती लक्षात घेता येथे एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेची एक शाखा देण्यात यावी, आणि शाखेचा विस्तार करावा अशी मागणी आहे.(वार्ताहर)
लिंक फेल होत असल्याने व्यवहार होतात ठप्प
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी बँकेत जावे लागते. या योजनांचा निधीसुद्धा बँकेमधून उपलब्ध करुन दिल्या जातो. त्यामुळे कामाचा व्याप वाढत आहे. याचा नाहक त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे.
येथील बँकेत परिसरातून आलेले ग्राहक असतात. त्यांनाही काम होईपर्यंत येथे दिवसभर थांबावे लागते. बँकेची लिंक फेल झाल्यास अनेकदा आल्यापावली परतावे लागते. शेवटच्या टप्प्यापर्यंतही व्यवहार होत नसल्याने श्रम आणि पैसा याचा अपव्यय सहन करावा लागतो. यावर तोडगा काढणे गरजेचे ठरत आहे.