केंद्राच्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचवा
By Admin | Updated: October 5, 2016 01:48 IST2016-10-05T01:48:40+5:302016-10-05T01:48:40+5:30
केंद्र शासनाच्या लोकोपयोगी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत व बेरोजगार युवकांपर्यंत पोहचविण्याकरिता अधिकाधिक प्रचार व प्रसार करावा,

केंद्राच्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचवा
रामदास तडस : जिल्हा विकास समितीची सभा
वर्धा : केंद्र शासनाच्या लोकोपयोगी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत व बेरोजगार युवकांपर्यंत पोहचविण्याकरिता अधिकाधिक प्रचार व प्रसार करावा, अशा सूचना समितीचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी दिल्या.
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. ग्रामीण विकास विभाग, भारत सरकारच्या व नवीन मार्गदर्शक सुचनेनुसार विकास भवन येथे या समितीची पहिली बैठक खासदार रामदास तडस यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
बैठकीला आमदार समीर कुणावार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, प्रकल्प संचालक प्रमोद पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय दैने, जि.प. चे उपाध्यक्ष विलास कांबळे, देवळी नगर परिषदेच्या अध्यक्ष शोभा तडस, सर्व नगर परिषदेचे अध्यक्ष समितीचे सदस्य माधव कोटस्थाने, दीपक फुलकरी, मनोनित सरपंच, सदस्य आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान ग्रामसडक योजना जिल्ह्यात येत्या काळात यशस्वी करण्याकरिता सर्व जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्याबाबत अधिकाऱ्यांना बैठकीत सूचना देण्यात आली. त्याचप्रमाणे पांदण रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात करण्याकरिता आमदार समीर कुणावार यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर खासदार रामदास तडस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य दखल घेण्याचे यावेळी सूचित केले.
केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक सुचनेनुसार बैठकीमध्ये महराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व शहरी, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, भूमी अभिलेख आधुनिकीकरण, दिन दयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, श्याम प्रसाद मुखर्जी अर्बन मिशन, अमृत योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, एनआरएचएम कार्यक्रम, सर्व शिक्षा अभियान, एकात्मिक बाल विकास योजना, शालेय पोषण आहार, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, डिजीटल योजना याचा आढावा घेण्यात आला.(स्थानिक प्रतिनिधी)