देवी अंगात आणणाऱ्या महिलेचा भंडाफोड
By Admin | Updated: September 24, 2014 23:39 IST2014-09-24T23:39:29+5:302014-09-24T23:39:29+5:30
शहरातील म्हाडा कॉलनी जवळील चिंतामणीनगर येथील एका घरी दरबार सुरू असलेल्या देवीचा महाराष्ट्र अंनिसने भंडाफोड केला़ यात कुटुंबीयांनी विनवणी करून माफी मागितल्याने जादुटोणा विरोधी

देवी अंगात आणणाऱ्या महिलेचा भंडाफोड
महाराष्ट्र अंनिसची कारवाई : फसवणूक न करण्याची दिली ग्वाही
वर्धा : शहरातील म्हाडा कॉलनी जवळील चिंतामणीनगर येथील एका घरी दरबार सुरू असलेल्या देवीचा महाराष्ट्र अंनिसने भंडाफोड केला़ यात कुटुंबीयांनी विनवणी करून माफी मागितल्याने जादुटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला नाही़
चिंतामणीनगर येथील पंढरी माने (नाव बदलले) यांच्या घरी येऊन आशा दिनकर मारबते (५०) रा़ घुईखेडा ता. चांदूर बाजार जि. अमरावती ही महिला अंगात देवी येते असे सांगून दरबार भरवित होती़ सदर दरबार सुरू असताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन भंडाफोड केला़ चिंतामणीनगर येथील कुटुंबाची आशा दिनकर मारबते या महिलेशी जवळीक झाली़ ही महिला घुईखेड येथे दरबार भरवून अंगात देवी आल्याचे भासवून अनेकांना फसवित होती. काही वाईट करण्याचा धाक दाखवित होती. सदर कुटूंब अनेकदा अडचणीत या महिलेच्या दरबारी जात होते़ सहा महिन्यांपूर्वी नोकरी गेल्याने या देवीच्या नादी लागले; पण घरची महिला विरोध करीत होती. पती व कुटुंब या देवीच्या मतानुसार वागत होते़ याचा त्रास या घरच्या महिलेला होत होता. तिने अनेकदा या देवीचा भंडाफोड करण्याचा प्रयत्न केला. यात मासिक पाळीत या देवीचा प्रभाव असल्याने सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. काही दिवसांपूर्वी ही देवी वर्धा मुक्कामी दरबार भरविण्यासाठी या कुटुंबाच्या घरी येणार आहे. तिचा खोटेपणा सर्वांसमक्ष यावा, अशी विनंती गजेंद्र सुरकार यांच्याकडे करण्यात आली़ यावरून या ढोंगी देवीचा मंगळवारी दुपारी १२़३० वाजता भंडाफोड करण्यात आला़
यावेळी नकली ग्राहक बनून समितीची कार्यकर्ता श्रेया गोडे गेली़ सदर कार्यकर्ता विधवा असताना तिने लग्न जुळत नाही, असे खोटे सांगितले. यावरून देवीने तिला ओळखले नाही. याच वेळी गजेंद्र सुरकार यांनी अन्य साथीदारांसह पोहोचून अंनिसचे कार्यकर्ते येणार, हे तुला कसे कळले नाही, खरच देवी असेल तर नोटेवरचा नंबर सांग, २१ लाख रुपये मिळेल, असे आव्हान दिले. यावर देवी बोलली नाही. पोलीस व जादुटोणा विरोधी कायद्याचा धाक दाखवताच चूक कबुल करून कान पकडून माफी मागितली. भंडाफोडचे पूर्ण चित्रिकरण कार्यकर्त्यांद्वारे करण्यात आले़ या मोहिमेत सारिका डेहनकर, श्रेया गोडे, जिल्हाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ बुटले, अनिल मुरडीव, राजेंद्र ढोबळे, सुधाकर मिसाळ, प्रकाश कांबले, भरत कोकावार, नरेंद्र कांबळे, दीपक बारापात्रे यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी मार्गदर्शन करण्यात आले़(कार्यालय प्रतिनिधी)