एक खिडकी योजनेने प्रवासी कोंडीत
By Admin | Updated: November 1, 2014 02:11 IST2014-11-01T02:11:38+5:302014-11-01T02:11:38+5:30
येथील रेल्वेस्थानकावर तिकीटविक्री कण्याकरिता एकच खिडकी असल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

एक खिडकी योजनेने प्रवासी कोंडीत
पुलगाव : येथील रेल्वेस्थानकावर तिकीटविक्री कण्याकरिता एकच खिडकी असल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. गाडी निघून गेल्यावर प्रवाशांच्या हाती तिकीट पडत असल्याचे प्रकार अनेकदा घडतात. यात प्रवाशांचा पैसा व वेळ याचा अपव्यय होत आहे. दोन काऊंटर असताना एकच सुरु ठेवत असल्याबाबत प्रवासीवर्गात संतापाची लाट आहे.
येथील रेल्वेस्थानकावर एक संगणीकृत आरक्षण खिडकी व एक अनारक्षित तिकीट खिडकी आहे. आरक्षण खिडकीवर अनारक्षित तिकीट मिळत नसल्याने याच काऊंटरवर गर्दी होते. तिकीटकरिता प्रवाशांना एकाच खिडकीवर महिलांची व पुरुषांची अशी वेगवेगळी रांग लावावी लागली. पूर्वी विभागीय रेल्वे प्रबंधक दिक्षीत येथे आले असता त्यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले होते. त्यांनी अनारक्षित तिकीट खिडकी वाढविण्याचे आश्वासन दिले. यानंतर येथील रेल्वेस्थानकावर अतिरीक्त काऊंटर सुरू झाले नाही.
शहरातून रोज विद्यार्थी, कामगार, नोकरवर्ग कामकाजानिमित्त वर्धा, नागपूर, धामणगाव, बडनेरा येथे जाणे-येणे करतात.तसेच पुलगावातून आर्वी, रोहणा, देवळी, कळंब आदी ठिकाणी आवागमन करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पुलगाव रेल्वेस्थानकावर प्रवाशांची बाराही महिने मोठी गर्दी असते. सर्वांना तिकीट घेऊन रेल्वेचा प्रवास करावा लागतो. अनेकदा तिकीट मिळेपर्यंत गाडी फलाटावर येऊन निघून जाते. प्रवासी मात्र तिकीट घेऊन निघून गेलेल्या गाडीकडे हताशपणे पाहताना आढळतो. या प्रकारामुळे प्रवाशाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. येथे साधारण तिकीट विक्रीची खिडकी उघडण्याची मागणी प्रवासी मंडळाकडून वारंवार करण्यात येत आहे. सैनिक व अधिकाऱ्यांकरिता स्वतंत्र खिडकीची व्यवस्था येथे करण्याची मागणी आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.(शहर प्रतिनिधी)