अपात्र उमेदवारांची अस्तित्वासाठी तर राकाँची प्रतिष्ठेकरिता लढत
By Admin | Updated: January 6, 2016 02:38 IST2016-01-06T02:38:01+5:302016-01-06T02:38:01+5:30
येथील नगर परिषदेत पक्षविरोधी कारवाईमुळे सहा उमेदवार अपात्र ठरले होते. त्या जागांकरिता १० जानेवारी रोजी पोटनिवडणूक होत आहे.

अपात्र उमेदवारांची अस्तित्वासाठी तर राकाँची प्रतिष्ठेकरिता लढत
सहा जागांकरिता ३० उमेदवार : सहाही जागा होत्या राकाँच्या ताब्यात
भास्कर कलोडे हिंगणघाट
येथील नगर परिषदेत पक्षविरोधी कारवाईमुळे सहा उमेदवार अपात्र ठरले होते. त्या जागांकरिता १० जानेवारी रोजी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षांनी उमेदवार दाखल केले आहे. या सहाही जागा पहिले राकाँच्या ताब्यात असल्याने त्यांच्याकरिता या सहाही जागा प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत. शिवाय पूर्वी राकाँच्या चिन्हावर निवडून येत पक्षविरोधी कारवाईने अपात्र ठरलेल्या पाच उमेदवारांनीही नामांकन दाखल केले आहे. या कारणाने ही निवडणूक सर्वांचे लक्ष वेधणारी आहे.
येथील नगर पालिकेच्या आठ पैकी चार प्रभागातील सहा जागाची पोटनिवडणूक होवू घातली आहे. या निवडणुकीच्या रिंंगणात असलेल्या उमेदवारांची संख्या ३० आहे. त्यांच्याकडून प्रचाराला गती आली असून निवडून येण्यासाठी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर उमेदवारांनी लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. अपात्र ठरलेले उमेदवार पूर्वी राकाँचे असल्याने त्याचा लाभ इतर पक्षांना होणार असल्याची चर्चा आहे. यामुळेच की काय येथे शिवसेना, काँग्रेस, बसपा व भाजपाच्यावतीने उमेदवारी दाखल करण्यात आली आहे.
३३ सदस्य असलेल्या या नगर परिषदेच्या १२ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने गत सार्वत्रिक निवडणुकीत काबीज केल्या होत्या.
पालिकेत पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून गत अडीच वर्ष त्यांच्याकडे सत्ता होती. अशात २१ जुलै २०१४ ला झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा नगरसेवकांनी पक्षविरोधी कारवाई केली. या विरोधात अॅड. कोठारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देत सहा जणांना अपात्र ठरविल्याने ही निवडणूक होत आहे.
या पोटनिवडणुकीतील सहाही जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाने उमेदवार निवडणुकीचे रिंगणात उतरविले असून काँग्रेसचे दोन, बसपाचे दोन, शिवसेनेचा एक तर १३ अपक्ष उमेदवार रिंगणात उभे आहेत.
सर्वाधिक उमेदवार प्रभाग सहामध्ये
प्रभाग क्रमांक दोन मध्ये चार तर याच प्रभागतील ब गटात पाच उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्र. ५ मध्ये चार उमेदवार आहेत. प्रभाग क्र. ६ मधे पाच तर याच प्रभागातील (ड) गटात चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. प्रभाग क्र. ७ मध्ये आठ उमेदवार आहेत. यामुळे ही पोटनिवडणूक अपात्र ठरलेल्या नगरसेवकांसाठी अस्तित्वाची तर राकाँसाठी प्रतिष्ठेची ठरत आहे. या निवडणुकीत मतदार कोणाला कौल देणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.