माजी सैनिकाच्या अवमानाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 23:18 IST2018-04-02T23:18:29+5:302018-04-02T23:18:41+5:30

Exhibition of former soldier's contempt | माजी सैनिकाच्या अवमानाचा निषेध

माजी सैनिकाच्या अवमानाचा निषेध

ठळक मुद्देन.प.समोर दिले धरणे : मुख्याधिकाऱ्यांशी चर्चेअंती आंदोलन घेतले मागे

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील सेवानिवृत्त कर्नल चित्तरंजन चवडे यांना वर्धा न. प. तील एका कर्मचाऱ्यांने अपमानास्पद वागणूक दिली. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी भारतीय माजी सैनिक संघाच्यावतीने नगर परिषदेच्या कार्यालयासमोर धरणे देत निषेध नोंदविण्यात आला. आंदोलनादरम्यान मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्याशी समारात्मक चर्चा झाली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
माजी सैनिकाला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या न.प. कर्मचाऱ्यावर चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, माजी सैनिकांचा अपमाण होणे ही निंदनिय बाब असून न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांनी माजी सैनिकांची जाहीर माफी मागावी या मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता माजी सैनिकांनी वर्धा नगर परिषदेच्या कार्यालयावर धडक देत न. प. प्रशासनाचा निषेध नोंदविला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी न.प. प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनाची माहिती मिळताच शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने यांनी आपल्या चमुसह न. प. कार्यालय गाठले. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. मात्र, आंदोलनकर्ते मुख्याधिकाऱ्यांची भेटून चर्चा केल्याशिवाय जाणार नाही यावर ठाम राहिले. ११.३० वाजताच्या सुमारास आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी चर्चा केली. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या जाणून घेत घडलेल्या प्रकार निंदनिय असल्याचे मान्य करीत न.प. प्रशासनाच्यावतीने माजी कर्नल चिंत्तरंजन चवडे यांच्यासह सर्व माजी सैनिकांची जाहीर माफी मागितली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. आंदोलनात माजी कर्नल चित्तरंजन चवडे, माजी सैनिक श्याम परसोडकर, प्रहारचे शहर अध्यक्ष विकास दांडगे यांच्यासह मोठ्या संख्येने माजी सैनिक, वीर माता व पत्नी सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Exhibition of former soldier's contempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.