बारावीच्या १९,९४९ विद्यार्थ्यांची परीक्षा
By Admin | Updated: February 28, 2017 01:10 IST2017-02-28T01:10:52+5:302017-02-28T01:10:52+5:30
प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात महत्त्वाची ठरणारी बाराव्या वर्गाची परीक्षा उद्या मंगळवारपासून सुरू होत आहे. ...

बारावीच्या १९,९४९ विद्यार्थ्यांची परीक्षा
जिल्ह्यात ४६ परीक्षा केंद्र : कॉपीमुक्त परीक्षेकरिता एकूण २१ पथके
वर्धा : प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात महत्त्वाची ठरणारी बाराव्या वर्गाची परीक्षा उद्या मंगळवारपासून सुरू होत आहे. या परीक्षेत विविध शाखेतील एकूण १९ हजार ९४९ विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याकरिता एकूण ४६ परीक्षा केंद्र आहेत.
बाराव्या वर्गात विज्ञान, वाणिज्य व कला शाखेच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांच्या भविष्याकरिता ही परीक्षा महत्त्वाची आहे. येथूनच पुढच्या भविष्याचा मार्ग ठरविता येतो. यामुळे ही परीक्षा जीवनातील वळणरस्ता म्हणूनही ओळखल्या जात आहे. हीच परीक्षा उद्यापासून सुरू होत आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याकरिता शिक्षण विभागाकडून संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेकरिता निवड करण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांची शिक्षण विभागाच्या परीक्षा मंडळाने तपासणी केली असून तसा अहवाल नागपूर परीक्षा विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा होण्याकरिता शिक्षण विभागाच्यावतीने विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याची माहितीही देण्यात आली. हा उपक्रम गत काही वर्षांपासून सुरू असून परीक्षेत कॉपीचे प्रमाण मात्र कायम असल्याचे दिसून आले आहे. होत असलेल्या या प्रकारावर आळा बसविण्याकरिता एकूण २१ पथके तयार करण्यात आली आहे. या पथकाची परीक्षा केंद्रावर कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर करडी नजर राहणार आहे. यात पाच भारारी पथके असून तालुका स्तरावर तहसीलदारांची आठ आणि त्याच स्तरावर गटविकास अधिकाऱ्यांची आठ पथके समाविष्ट आहेत. (प्रतिनिधी)
११ पर्यवेक्षकांची नियुक्ती
जिल्ह्यातील ४६ परीक्षा केंद्रावर माहिती पुरविण्याकरिता एकूण ११ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडे परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्र व उत्तरपत्रिका पोहोचविण्यासह परीक्षेनंतर त्यांचे संकलन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.