माजी पं.स. सदस्याचा मृतदेह आढळला
By Admin | Updated: June 2, 2014 01:36 IST2014-06-02T01:36:55+5:302014-06-02T01:36:55+5:30
आर्वी पंचायत समितीचे माजी सदस्य बखाराम पांडुरंग अवथळे (८0) रा. खरांगणा ..

माजी पं.स. सदस्याचा मृतदेह आढळला
आकोली : आर्वी पंचायत समितीचे माजी सदस्य बखाराम पांडुरंग अवथळे (८0) रा. खरांगणा यांचा त्यांच्या घरापासून शंभर फुटावर संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला. मृतकाच्या अंगावरील जखमांवरुन त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना रविवारी सकाळी उघड झाली असून या प्रकरणी एकाला चौकशीकरिता ताब्यात घेतले आहे. जोपर्यंत शवविच्छेदन अहवाल येत नाही तोपर्यंत काहीही सांगणे कठीण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस सूत्राकडून, बखाराम अवथळे यांना दोन पत्नी होत्या. त्यांची पहिली पत्नी मासोद मार्गावरील घरी मुलाकडे राहते, तर बखाराम हे खरांगणा वस्तीत राहणार्या दुसर्या पत्नीकडे राहत होते. शनिवारी दुपारी नित्याप्रमाणे चहा घेऊन ते घराबाहेर पडले ते सायंकाळी घरी परतले नाही. आज सकाळी मासोद मार्गाकडून घराकडे येणार्या निर्जन वाटेवर काटेरी झुडपात मृतदेह आढळून आला. यामुळे रात्री त्यांचा शोध घेण्यात आला नसवा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृतकाच्या शेजारी मृतकाची काठी पडलेली असून पायातील एक जोडा पडून दिसला. मृतदेह पडून असलेले ठिकाण निर्जन व झाडाझुडपांनी वेढले आहे. मृतकाच्या डोक्याला व डोळ्याला माराच्या जखमा तर कानाखाली ओरबडल्याच्या खुना आहे. खरांगण्याचे ठाणेदार के.आय. मिर्झा सहायक उपनिरीक्षक हरीभाऊ राऊत, विनोद इंगोले यांनी घटनास्थळाच्या पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीकरिता सामान्य रुग्णालयात पाठविले आहे. पोलिसांनी संशयित म्हणून एकाला ताब्यात घेतले असून त्याचे नाव सांगण्यास नकार दिला. प्रकरणाचा तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर सत्य समोर येईल असे पोलिसांचे म्हणने आहे. (वार्ताहर)