सर्वोदयी विचारानेच विकास शक्य
By Admin | Updated: November 15, 2014 22:51 IST2014-11-15T22:51:12+5:302014-11-15T22:51:12+5:30
मास प्रॉडक्शन हा शब्द सध्या सर्वत्र प्रचलित आहे. परंतु या शब्दाऐवजी प्रॉडक्शन बाय द मासेस ही कृती अंगीकारल्यास खरे ग्राम स्वराज येऊ शकते. आपण आत्मघाती विकासामुळे विनाशाकडे चाललो

सर्वोदयी विचारानेच विकास शक्य
अमरभाई यांचे प्रतिपादन : विनोबा आश्रमात मित्र-मिलन सोहळा
पवनार : मास प्रॉडक्शन हा शब्द सध्या सर्वत्र प्रचलित आहे. परंतु या शब्दाऐवजी प्रॉडक्शन बाय द मासेस ही कृती अंगीकारल्यास खरे ग्राम स्वराज येऊ शकते. आपण आत्मघाती विकासामुळे विनाशाकडे चाललो असून यातून बाहेर पडायचे असेल तर सर्वोदय विचार याचा पर्याय असू शकतो असे मत ग्रामस्वराज-कृषी संस्कृती य विषयावर मार्गदर्शन करताना अमरभाई यांनी व्यक्त केले. द्वितीय सत्रात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
आचार्य विनोबा भावे यांच्या ब्रह्मनिर्वाण दिनी ब्रह्म विद्या मंदिर पवनार येथे मित्र-मिलन सोहळ्याचे आयोजन १५, १६ आणि १७ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. यावेळी द्वितीय सत्रात ग्रामस्वराज कृषी संस्कृती हा विषयावर अमरभाई यानी विचार व्यक्त केले.
यंदा मित्र मिलन सोहळ्याचा विषय ‘सर्वोदय की दिशा मे.. बढते कदम’ असा ठेवण्यात आला आहे. या संमेलनामध्ये देशभरातील ७०० च्या वर सर्वोदयी कार्यकर्ते सहभागी झाले आहे. तीन दिवस चालत असलेल्या या संमेलनात सर्वोदयची दिशा या विषयावर चर्चा होणार आहे. शनिवारी संमेलनाला सुरुवात करताना शिला दिदी यांनी सोहळ्याच्या आयोजनाचा उद्देश उपस्थितांना सांगितला. प्रथम सत्रामध्ये नारायण देसाई, महेंद्रभाई यांनी ग्राम स्वराज या विषयावर यथोचित मार्गदर्शन केले.
या चर्चासत्रात सुब्बाराव, सुभाष पाळेकर, कमल टावरी, मूर्ती यांनीही मार्गदर्शन केले. सत्राचे संचालन रमेशभाई यांनी केले.
या सोहळ्यासाठी संपूर्ण विनोबा आश्रमाला साध्या पण सुंदर पद्धतीने सुशोभित करण्यात आले आहे. दरवर्षी विनोबा भावे यांच्या ब्रह्मनिर्वाण पर्वावर मित्र मिलन आयोजित केले जाते.
देशभरातील सर्वोदयी सहभागी यात होत असतात. महिला कार्यकर्त्यांची यात मोठी उपस्थिती असते. डॉ. अभय बंग यांनीही या वेळी हजेरी लावत आश्रमातील ज्येष्ठांची आस्थेने चौकशी केली.(वार्ताहर)