प्रत्येकाला करावी लागणार कार्यकर्त्यांची जुळवाजुळव
By Admin | Updated: November 14, 2016 00:56 IST2016-11-14T00:56:02+5:302016-11-14T00:56:02+5:30
न.प. निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आदेशित केले आहे.

प्रत्येकाला करावी लागणार कार्यकर्त्यांची जुळवाजुळव
वर्धा : न.प. निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आदेशित केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपलीच सत्ता असावी म्हणून सर्वच धडपड करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. नेत्यांसह त्यांच्या चेलेचपाट्यांची धावपळ पाहावयास मिळत आहे. कमी जागांसाठी अधिक उमेदवार आणि कार्यकर्ते ‘लिमीटेड’ असल्याने प्रत्येक उमेदवाराची कार्यकर्ते जुळवताना मात्र दमछाक होत असल्याचे चित्र सध्या आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय पक्षांचे धोरण वेगळे असते. मुख्यालयी युती, आघाडी झालेली असली तरी स्थानिक परिस्थिती पाहूनही निर्णय घेतले जातात. यंदाच्या निवडणुकीत बऱ्याच नवीन चेहऱ्यांना ‘लॉटरी’ लागली आहे. यामुळेच वर्धा, हिंगणघाट, देवळी, पुलगाव, आर्वी आणि सिंदी (रेल्वे) या सर्वच नगर परिषद क्षेत्रामध्ये बंडाळीचा झेंडा पाहावयास मिळत आहे. कालपर्यंत एकाच पक्षात सोबत काम केलेली नेते मंडळी आणि एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचे दिसून येत आहे. यात एक पक्षाचा अधिकृत तर दुसरा अपक्ष राहून जोर लावणार असल्याचे पाहावयास मिळत आहे. याचा दगाफटका राजकीय पक्षांच्या उमेदवारांना होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. निवडणूक प्रचाराचा कलगीतुरा सध्या रंगात येण्यास सुरूवात होत असल्याचे दिसते. एकाच पक्षातील दोन नेते विरोधात उभे ठाकल्याने कार्यकर्त्यांची फळी विभागली जात असल्याचे दिसून येत आहे. नगराध्यक्ष आणि नगर सेवक पदाच्या उमेदवारांना यामुळेच सर्वप्रथम कार्यकर्ते जमविण्यासाठी धडपडावे लागत असल्याचे दिसते. नोटांच्या निर्णयाचाही कार्यकर्ते जुळविण्यावर विपरित परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
राजकीय पक्षांच्या उमेदवारांसोबत काही कार्यकर्ते दिसत असले तरी अपक्ष उमेदवारांकडे कार्यकर्त्यांची फळी अद्याप दिसून येत नाही. नगरसेवकांचा प्रचार तर प्रभागापूरताच मर्यादित असणार आहे; पण नगराध्यक्ष पदासाठी संपूर्ण शहर पिंजून काढावे लागणार आहे. मग, कार्यकर्तेच पदरी नसतील तर प्रचार कसा करणार, मतदारांची मनधरणी कशी करणार आदी प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या सर्वच उमेदवार याच प्रश्नांची उत्तरे शोधण्यात व्यस्त असल्याचे दिसते.(कार्यालय प्रतिनिधी)