दर गुरुवारी वर्धेकर पाळणार ‘नो व्हेईकल डे’
By Admin | Updated: December 21, 2015 02:11 IST2015-12-21T02:11:14+5:302015-12-21T02:11:14+5:30
सर्वत्र प्रदूषणाची बिकट समस्या निर्माण झालेली आहे. प्रत्येकांना याची झळ पोहचत आहे.

दर गुरुवारी वर्धेकर पाळणार ‘नो व्हेईकल डे’
विविध संघटनांचा बैठकीत निर्धार : ‘लोकमत’ कार्यालयाजवळ एकत्र येऊन करणार शुभारंभ
वर्धा : सर्वत्र प्रदूषणाची बिकट समस्या निर्माण झालेली आहे. प्रत्येकांना याची झळ पोहचत आहे. याची सुरुवात स्वत:पासून केल्यास आपण आपल्या कुटुंबाला, समाजाला आणि देशाला काही प्रमाणात का होईना यापासून वाचवू शकू, अशी खूणगाठ मनाशी बाळगून वर्धेकरांनी ‘लोकमत इनिशिएटिव्ह’ला ओ देत येत्या गुरुवार (दि.२४ डिसेंबर) पासून वर्धेत ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. याच वेळी ही चळवळ नित्यनेमाने कायमस्वरुपी राबविण्याचा एकमुखी निर्धारही रविवारी हुतात्मा स्मारक येथे आयोजित बैठकीअंती केला. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर प्रामुख्याने हजर होते.
‘नो व्हेईकल डे’बाबत ‘लोकमत’ने वृत्त मालिकेच्या माध्यमातून ‘लोक जागर’ केला. याची दखल वर्धेकरांनी पहिल्या दिवसापासून घेणे सुरू केले. बघता बघता याला चळवळीचे स्वरुप वर्धेकरांनी देत ही आपली मोहीम समजून सक्रिय सहभागाची ग्वाही ‘लोकमत’ला दिली. शहरातील ३२ सामाजिक संघटनांसह शासकीय कर्मचारी संघटनाही यासाठी सरसावल्या. हा दिवस सर्वानुमते ठरावा. सर्वांनी नियोजनबद्ध पद्धतीने याची अंमलबजावणी करावी. वर्धेतील प्रत्येक स्तरातील नागरिकांनी या चळवळीत स्वत: सक्रिय सहभाग घ्यावा, ही बाब विचारात घेऊन आम्ही वर्धेकरचे संजय इंगळे तिगावकर आणि वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिन पावडे यांनी पुढाकार घेत आज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील हुतात्मा स्मारक येथे विशेष बैठकीचे आयोजन केले होते. ठरल्यानुसार अगदी सायंकाळी ४ वाजता शहरातील सक्रिय सहभाग दर्शविलेल्या ३२ संघटनांसह अन्य काही संघटनांच्या प्रतिनिधींनी आवर्जून हजेरी लावली.
प्रत्येकांनी ‘लोकमत’ला धन्यवाद देत ‘नो व्हेईकल डे’वर वैचारिक मुद्दे चर्चेला आणले. यामुळे पर्यावरणाचा बचाव कसा होईल, आपण आपल्या कुटुंबासाठी काहीतरी केले पाहिजे, यासह अनेक गंभीर बाबींवर सकारात्मक चर्चा घडवून आणली. यामध्ये दर गुरुवारी शहरात ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. ही संकल्पना ‘लोकमत’ची असल्यामुळे या लोक चळवळीचा शुभारंभही ‘लोकमत’ कार्यालयासमोरुनच सकाळी ८.३० वाजता करण्याचे सर्वानुमते ठरविले. या बैठकीला आम्ही वर्धेकर, वैद्यकीय जनजागृती मंच, युवा सोशल फोरम, वर्धा सोशल फोरम, बहार नेचर फाऊंडेशन, निसर्ग सेवा समिती, न्यू इंग्लिश हायस्कूल, अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वर्धा एमआयडीसी असोसिएशन, जनहित मंच, जे.बी.सायन्स कॉलेज, भारतीय माजी सैनिक संघ, विदर्भ साहित्य संघ, फुलोरा, प्रहार समाज जागृती संस्था, इंडियन मेडिकल असोसिएशन, किसान अधिकार अभियान, अध्ययन भारती, लायन्स क्लब, नवभारत अध्यापक विद्यालय, यशवंतराव दाते स्मृती संस्था, निमा (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असो.), वर्धा डॉक्टर्स असोसिएशन, एच.एम.ए.आय., वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी संघ, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, राज्य कर्मचारी संघटना व महसूल संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, स्वामी मुक्तानंद योग समिती या संघटनांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते. नाट्य दिग्दर्शक हरीश इथापे यांनी बैठकीचे संचालन केले.(जिल्हा प्रतिनिधी)