रोज १० हजार विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

By Admin | Updated: August 5, 2016 01:54 IST2016-08-05T01:54:30+5:302016-08-05T01:54:30+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक योजनेनुसार जिल्ह्यात एकूण ९ हजार ५८७ विद्यार्थ्यांनी महिनेवारीची पास काढली आहे.

Everyday life of 10 thousand students | रोज १० हजार विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

रोज १० हजार विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

बसगाड्या कुठेही पडतात बंद : अनेकवेळा महत्त्वाच्या तासिकांना बसते दांडी
वर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक योजनेनुसार जिल्ह्यात एकूण ९ हजार ५८७ विद्यार्थ्यांनी महिनेवारीची पास काढली आहे. ही पास काढल्यानंतर आपल्याला बसमधून जात वेळेवर शाळा गाठता येईल, असे या पासधारक विद्यार्थ्यांना वाटत असताना परिवहन विभागाच्या बेभरवश्याच्या बसगाड्यांमुळे त्यांची अडचण होत आहे. बस येईल अथवा नाही या विचाराने या विद्यार्थ्यांना जीव रोजच टांगणीला लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
शासनाच्या योजनेनुसार वर्धा परिवहन महामंडळाकडून विविध योजनेंतर्गत एकूण ५ हजार ८७ विद्यार्थ्यांनी पास काढली आहे. तर अहिल्याबाई होळकर योजनेंतगर्गत ४ हजार ५०० विद्यार्थिनींना पास देण्यात आली आहे. या दोन्ही योजनेंतर्गत आठही तालुक्यातील विद्यार्थी शहरी भागात शिक्षणाकरिता ये-जा करीत आहेत. मात्र त्यांना महामंडळाच्या बसगाड्यांच्या अनागोंदीचे चटके सहन करावे लागत आहे. परिवहन महामंडळाच्या बसगाड्या रस्त्याने धावण्यापेक्षा त्या धावताना रस्त्यात बंद पडण्याचे प्रमाणच अधिक असल्याचे दिसून आले आहे.
विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासह शाळा संपल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या वेळेत बसगाड्या येणे अपेक्षित असताना तसे घडत नाही. बसगाड्यांच्या नादुरूस्त अवस्थेमुळे बऱ्याच वेळी वेळेवरच फेऱ्या रद्द झाल्याने या विद्यार्थ्यांना शाळेला वा महाविद्यालयांना दांडी देण्याची वेळ येते. तर शाळा सुटल्यानंतर वेळेवर येत नसलेल्या बसगाड्यांमुळे विद्यार्थ्यांना त्यांचे घर गाठण्याकरिता रात्र होते. अशीच घटना बुधवारी देवळी येथे घडली. तब्बल तीन तास बस आली नसल्याने विद्यार्थ्यांना थेट पोलीस ठाणे गाठावे लागले. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा प्रश्न सुटला. चार तासानंतर येथे बसगाडी आली. यानंतर एकाच वेळी दोन बसगाड्या आल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाणे सोईचे झाले. प्रवासी संख्या वाढविण्याकरिता याच विभागाकडून विविध उपक्रम राबविले जात असले तरी नादुरूस्त व भंगार बसेसमुळे महामंडळाच्या योजना जिल्ह्यात कुचकामी ठरत असल्याचे दिसते.(प्रतिनिधी)

देवळीतील घटनेने राज्य परिवहन महामंडळ काही बोध घेईल का ?

वेळेवर बस असली नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी थेट पोलीस ठाणे गाठण्याचा प्रकार बुधवारी देवळी येथे घडला. यावेळी बस न येण्यामागचे कारण पोलिसांकडून विचारताच महामंडळाकडून तत्काळ बसची व्यवस्था करण्यात आली. जर वेळीच महामंडळाने बसची व्यवस्था केली असती तर अशी वेळ आली नसती, असे बोलले जात आहे. बसकरिता जर विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्याची पायरी चढण्याची वेळ येत असेल तर मग महामंडळाकडून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याकरिता असलेल्या योजनांचा काय उपयोग, असा सवाल विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे.

पास असतानाही आर्थिक भुर्दंड
परिवहन महामंडळाच्या विविध योजनांतर्गत पास असताना केवळ वेळेवर बसगाड्या येत नसल्याने या विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करीत खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. मग पैसे मोजून पास काढून काय उपयोग, असे म्हणण्याची वेळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर आली आहे.

 

Web Title: Everyday life of 10 thousand students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.