अखेर वर्धा पालिकेला आली जाग
By Admin | Updated: May 21, 2015 02:02 IST2015-05-21T02:02:05+5:302015-05-21T02:02:05+5:30
पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील नाल्यांचा उपसा करून पाणी वाहून जाण्याकरिता त्या मोकळ्या करण्याची जबाबदारी पालिकेची आहे.

अखेर वर्धा पालिकेला आली जाग
वर्धा : पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील नाल्यांचा उपसा करून पाणी वाहून जाण्याकरिता त्या मोकळ्या करण्याची जबाबदारी पालिकेची आहे. असे असताना त्यांच्याकडून या संदर्भात कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले. याची दखल घेत पालिकेच्या बांधकाम विभागाद्वारे शहरातील नालेसफाईच्या कामांना सुरुवात करण्यात आली.
वर्धा शहरातून तीन मोठे नाले वाहत आहेत. शहरातील छोट्या नालीतील पाणी या मोठ्या नाल्यात येते. यामुळे या नाल्यातील कचरा उपसण्याची गरज आहे. यंदा जून महिन्याच्या प्रारंभीलाच मान्सून धडकणार असल्याचे संकेत वेध शाळेने दिले आहे. त्या अनुशंगाने पालिकेच्यावतीने शहरातील नाल्यांची स्वच्छता करणे क्रमाप्राप्त असतानाही यासंदर्भातील उपाययोजनेसंदर्भात पालिकेत साधी बैठकही घेण्यात आली नव्हती.
नालेसफाई व्हावी तसेच ही बाब शहरवासीयांच्या निदर्शनास यावी यासाठी लोकमतमध्ये ‘पावसाच्या तोडावर नाल्या तुंबलेल्याच’ आणि ‘शहरातील स्वच्छतेवर पालिकेची चुप्पी’ अश्या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची तात्काळ दखल घेत नालेसफाईच्या कामांना सुरुवात करण्यात आल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले. तसेच सुरू झालेल्या सफाईच्या कामांवरूनही ही बाब प्रत्ययास येत आहे.
यासंदर्भात पालिकेतील संबंधित अधिकारी वर्गाला या बाबत विचारले असता पालिकेच्या पैशाची बचत करण्यासाठी पालिकेच्याच बांधकाम विभागाला नाले सफाईसंदर्भात पत्र देण्यात आले. त्यानुसार पालिकेतील सफाई कामगारांच्या सहकार्याने नालेसफाईला सुरुवात केली असून लवकरच काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.
सध्या शहरातील मुख्य मार्गावरील नाल्यांच्या सफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. पावसापूर्वीच शहरातील सर्वच नाल्यांची सफाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सफाईकामांमुळे नाल्याही मोकळा श्वास घेत असल्याचे दिसते.(शहर प्रतिनिधी)