अखेर नागरिकांनी बुजबिला खड्डा
By Admin | Updated: September 9, 2014 00:34 IST2014-09-09T00:34:59+5:302014-09-09T00:34:59+5:30
कित्येक दिवसांपासून वर्धा-पवनार मार्गादरम्यान दत्तपूर परिसरात रस्ता उखडल्याने पडलेला दहा ते बारा फुटाचा खड्डा अपघातास कारणीभूत ठरत आहे. तरीही प्रशाला जाग येत नसल्याने अखेर

अखेर नागरिकांनी बुजबिला खड्डा
वर्धा : कित्येक दिवसांपासून वर्धा-पवनार मार्गादरम्यान दत्तपूर परिसरात रस्ता उखडल्याने पडलेला दहा ते बारा फुटाचा खड्डा अपघातास कारणीभूत ठरत आहे. तरीही प्रशाला जाग येत नसल्याने अखेर सोमवारी पवनार येथील काही नागरिकांनी पुढाकार घेत स्वत: गिट्टी, विटा, चुरी आणून तो खड्डा बुजविला.
रविवारपासून गणेश विसर्जनाला सुरुवात झाली. त्यामुळे पवनारकडे जात असलेल्या रस्त्यावर दुचाकीसह चारचाकी वाहनांची वर्दळ होती. पावसामुळे दत्तपूर परिसरात रस्त्यावर आठ ते दहा फुटाचे एक मोठे भगदाड पडले आहे. बांधकाम विभागाद्वारे हा खड्डा लवकरात लवकर बुजविल्या जाणे गरजेचे असतानाही त्याकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. सततच्या पावसामुळे हा खड्डा पाण्याने भरत असल्याने तो ये जा करीत असलेल्या नागरिकांना दिसत नाही. परिणामी दुचाकीस्वारांचे अपघात आता नित्याचेच झाले आहे.
शेवटी गणेशविसर्जनासाठी जाताना नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेत पवनार येथील काही नागरिकांनी स्वखर्चाने विटा, गिट्टी, चुरी असे साहित्य आणून हा खड्डा बुजविला.
यासंदर्भात संबंधित विभागाला वारंवार कळविण्यात आले आहे. तसेच हा खड्डा किती धोकादायक आहे याची जाणीवही वेळोवेळी नागरिकांद्वारे करून देण्यात आली आहे. तरीही प्रशासनाद्वारे दुर्लक्ष केले जात असल्याने प्रवासी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.
हा खड्डा बुजविण्यासाठी पवनार येथील नरेश बावणे, रुकेश बावणे, प्रमोद नगराळे, अनिल नगराळे, राजू ठाकूर आदींनी पुढाकार घेतला. स्वत: नागरिकच पुढाकार घेत आहे हे पाहून ये जा करीत असलेल्या गणेशभक्तांचे हातही सरसावले. आणि त्यांनीही खड्डा बुजविण्यासाठी मदत केली. या खड्ड्यामुळे गत महिनाभरात चार ते पाच अपघात झाले आहे. रात्री या मार्गावर अवजड वाहने धावत असतात. खड्डा चुकविण्याच्या नादात ते समोरून येत असलेल्या वाहनावर आदळत असल्याने अपघात होत आहे. रविवारीच गणपती शिवायला गेलेल्या चौघांचा अपघात झाला. त्यामुळे पक्की डागडुजी होणे गरजेचे आहे.(शहर प्रतिनिधी)