भिडीचा प्रवासी निवारा कोसळण्याच्या स्थितीत
By Admin | Updated: August 29, 2014 00:02 IST2014-08-29T00:02:24+5:302014-08-29T00:02:24+5:30
स्थानिक प्रवासी निवाऱ्याच्या दुरुस्तीकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे येथील निवाऱ्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून तो कधी कोसळेल, याची शाश्वती नाही.

भिडीचा प्रवासी निवारा कोसळण्याच्या स्थितीत
भिडी : स्थानिक प्रवासी निवाऱ्याच्या दुरुस्तीकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे येथील निवाऱ्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून तो कधी कोसळेल, याची शाश्वती नाही. यामुळे जीवितहानी होण्याचा धोका वाढला आहे. हा प्रकार टाळण्याकरिता या समस्येची दखल घेऊन येथे नवीन प्रवासी निवारा बांधावा, अशी येथील नागरिकांनी मागणी केली आहे.
भिडी बसस्थानक हे परिसरातील नागरिकांकरिता महत्त्वाचे आहे. नागपूर-यवतमाळ या राज्य मार्गावर भिडी गाव येते. या गावावरुन यवतमाळ, माहुर, मरठवाडा तसेच वर्धा, नागपूर येथे जाण्याकरिता बसगाड्या मिळतात. शिअवाय येथे काही जलद बसगाड्यांचे थांबे देण्यात आले आहे. यामुळे जवळपास २० ते २५ गावातील प्रवासी येथील बसथांब्यावरून गाडी घेतात.
येथील प्रवासी निवाऱ्यावरुन परिसरातील गावाकडे जाण्याकरिता बस मिळते. यामुळे १० ते १२ खेड्यावरील प्रवासी येथून ये-जा करतात. येथील प्रवासी निवाऱ्यावर कायम वर्दळ असते. दररोज येथून ४०० ते ५०० प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे येथील प्रवासी निवारा महत्त्वाचा आहे. परिवहन मंडळाला भिडी स्थानकावरुन चांगले आर्थिक उत्पन्न प्राप्त होते. परंतु येथे सुविधा देण्याकडे परिवहन मंडळाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा प्रत्यय येथील नागरिकांना येतो.
स्थानिक प्रवासी निवाऱ्याच्या भिंतीला मोठमोठे तडे गेले आहे. ती भिंत केव्हाही कोसळू शकेल अशा स्थितीत आहे. तरीही त्याची साधी डागडूजी केली जात नाही. यासह येथे प्रवाशांना बसण्याची योग्य व्यवस्था नाही. येथे दिवसाला अनेक प्रवासी येतात तरीही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली नाही. प्रवासी निवाऱ्याची दैनावस्था प्रवाशांच्या जीवावर बेतणारी ठरु शकते. विशेषत: विद्याथी या प्रवासी निवाऱ्यात थांबत असतात. मोठी दुर्घटना होण्यापूर्वी येथील प्रवासी निवारा त्वरीत बांधण्यात यावा, अशी ग्रामस्थ व प्रवाश्यांची मागणी आहे. संबंधित विभागाने लक्ष देत कार्यवाही अरुन प्रवासी, विद्यार्थी यांना दिलासा देण्याची मागणी आहे.(वार्ताहर)