‘जय अंबे’ च्या गजरात दूर्गेची स्थापना
By Admin | Updated: September 25, 2014 23:27 IST2014-09-25T23:27:24+5:302014-09-25T23:27:24+5:30
जय अंबे... जय दूर्गेचा गजर, ढोल ताशांचा निनाद व गुलालाची उधळण करीत नवदूर्गेची स्थापना करण्यात आली. शहरात सकाळपासूनच दूर्गेची स्थापना करण्यात सर्वच मंडळाचे कार्यकर्ते व्यस्त होते.

‘जय अंबे’ च्या गजरात दूर्गेची स्थापना
वर्धा : जय अंबे... जय दूर्गेचा गजर, ढोल ताशांचा निनाद व गुलालाची उधळण करीत नवदूर्गेची स्थापना करण्यात आली. शहरात सकाळपासूनच दूर्गेची स्थापना करण्यात सर्वच मंडळाचे कार्यकर्ते व्यस्त होते. रात्री उशिरापर्यंत दूर्गेची स्थापना सुरू होती.
नवरात्र सुरू होण्यापूर्वी महिनाभरापासून दूर्गेच्या स्वागताकरिता विविध मंडळाचे कार्यकर्ते कामाला लागले होते. वर्गणी गोळा करण्यापासून तर रोषणाईच्या कामात सारे व्यस्त होते. यातही इतर मंडळाच्या तुलनेत आपल्या मंडळाची रोषणाई कशी चांगली दिसेल, आपण यंदा नवीन काय करावे याची योजना आखून कामे आटोपून गुरुवारी सर्वत्र दूर्गेची स्थापना करण्यात आली. सार्वजनिक स्थळी होणाऱ्या दूर्गेच्या स्थापनेसह घरोघरी घटही मांडण्यात आले. यात शहरातील नागरिक सकाळपासून व्यस्त होते.
शहरात बुधवारपर्यंत परवानगीकरिता ७० मंडळांनी संपर्क साधल्याचे पोलीस विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. तर गत वर्षी जिल्ह्यात एकूण ५६० सार्वजनिक दूर्गा मंडळांनी दूर्गेची स्थापना केल्याची नोंद आहे. नवरात्रोत्सवादरम्यान वर्धेत होत असलेली रोषणाई पाहण्याकरिता केवळ शहरातीलच नाही तर बाहेरगावातील नागरिकही येतात. त्यांच्या स्वागतकारिता वर्धेतील मंडळे तयार झाली आहेत.
या नऊ दिवसात शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाकरिता मोठ मोठे कलाकारही वर्धेत येत असतात. त्यांच्या संगिताच्या कार्यक्रमाची मेजवानी वर्धेकरांकरिता आकर्षण ठरणारी आहे. (प्रतिनिधी)