जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2015 01:45 IST2015-06-22T01:45:01+5:302015-06-22T01:45:01+5:30
जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारी सायंकाळीही सुरूच होता. विदर्भात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
शेतकरी सुखावला : पेरणीच्या कामांना वेग; अतिवृष्टीचे संकेत
वर्धा: जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारी सायंकाळीही सुरूच होता. विदर्भात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हा इशारा खरा होत असल्याचे सायंकाळी दाटून आलेले ढग व पावसाच्या संततधारेवरून जाणवत होते. शनिवारी रात्री व रविवारी सायंकाळी आलेला पाऊस संपूर्ण जिल्ह्यातच असल्याचे चित्र आहे.
शनिवारी रात्री आलेल्या पावसाची नोंद रविवारी सकाळी घेण्यात आली. यात आष्टी (शहीद) व हिंगणघाट तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. एका दिवसात ६५ मिमीच्या वर पावसाची नोंद झाल्यास अतिवृष्टीची नोंद होते. यानुसार आष्टी तालुक्यात १११ मिमी तर हिंगणघाट तालुक्यात ६७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारचा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र असल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाची चिंता मिटली आहे.
जिल्ह्यात जोरदार पाऊस आल्याशिवाय पेरणी करू नये असा सल्ला कृषी विभागाच्यावतीने देण्यात आला होता. शनिवारचा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र असल्याने शेतकरी सुखावला. शनिवारी रात्री आलेला पाऊस रविवारीही दुपारपर्यंत सुरूच होता. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वर्धा शहरात व परिसरात पुन्हा पावसाला सुरुवात झाली. यावेळी दाटून आलेल्या ढगांमुळे अतिवृष्टीचा इशारा पूर्ण होतो की काय असे चित्र जिल्ह्यात दिसत होते. आलेल्या पावसामुळे कुठे पूर आल्याचे वृत्त नाही. शिवाय कुठे जीवितहानी झाल्याचीही माहिती नाही. पावसामुळे वातावरणातही सर्वत्र गारवा पसरला होता. (प्रतिनिधी)