कामात आनंद मानला की सगळं जमतं!
By Admin | Updated: January 24, 2015 22:59 IST2015-01-24T22:59:25+5:302015-01-24T22:59:25+5:30
आतापर्यंतचं आयुष्य केवळ कष्ट उपसण्यात गेलं. पण हाताला चव होती म्हणून लोकांना खाऊ घालण्याचं काम इमानदारीनं केलं. मुख्य म्हणजे त्यात समाधान मानलं. त्यामुळे लोकही चांगलच बोलतात.

कामात आनंद मानला की सगळं जमतं!
रस्त्यावरचे जीवन : कामाच्या धडपडीने दिले आशाबार्इंना बळ
पराग मगर - वर्धा
आतापर्यंतचं आयुष्य केवळ कष्ट उपसण्यात गेलं. पण हाताला चव होती म्हणून लोकांना खाऊ घालण्याचं काम इमानदारीनं केलं. मुख्य म्हणजे त्यात समाधान मानलं. त्यामुळे लोकही चांगलच बोलतात. हे सगळ आशाबाई ठेल्यावर काम करताना सहज सांगतात. कामाची लय अचूक साधत त्या आपल्या भावनांना वाट मोकळी करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सारं काही सांगून जातो.
४५ ते ५० च्या आसपास असलेल्या आशा राम गोडे थोडीथोडकी नव्हे तर १३ वर्षांपासून आर्वी नाका परिसरात ठेला चालवितात. त्या सांगतात, अगदी सहा महिन्याच्या असतानाच त्यांचा हात भाजला. त्यामुळे बोटांना काहीसं अधूपन आलं. शिक्षण जेमतेम तिसरीपर्यंतच, घरची परिस्थिती बेताचीच. त्यामुळे घरोघरी स्वयंपाक करायला सुरुवात केली. लग्नानंतरही सगळं लयबद्ध सुरू होत. कामाची धडपड आणि येत असलेला स्वयंपाक पाहून मदतीचा हात दिलेल्या काही जवळच्यांनी स्वतंत्र ठेला टाकून स्वत:चा व्यवसाय टाकण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला भीती वाटली पण आपण सर्वांशी चांगलं असलं की सगळे आपल्याशीही चांगलच वागतात या मतावर विश्वास ठेवत ठेला सुरू केला. आज पोटाची निकड भागते. लोकही खाऊन सुखी होतात. मग आणखी काय हवं. मूल बाळ नाही, नवऱ्याच्या डोळ्याचं आॅपरेशन झालं आहे. त्यामुळे आता केवळ नवऱ्यासाठीच जगायच आहे. आतापर्यंत कामात देव मानला. आताही तेच करायचं असं जगण्याचं साधं सोपं तत्वज्ञान त्या काम करतानाच सांगून मोकळ्या होतात.