मराठी माध्यमाच्या विध्यार्थ्यांना इंग्रजीत प्रश्नसंच
By Admin | Updated: February 7, 2015 23:29 IST2015-02-07T23:29:22+5:302015-02-07T23:29:22+5:30
जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेशाकरिता शुक्रवारी घेण्यात आलेल्या परीक्षेत मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे पेपर दिल्याने चांगलाच गोंधळ उडाला.

मराठी माध्यमाच्या विध्यार्थ्यांना इंग्रजीत प्रश्नसंच
वर्धा : जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेशाकरिता शुक्रवारी घेण्यात आलेल्या परीक्षेत मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे पेपर दिल्याने चांगलाच गोंधळ उडाला. परीक्षेनंतर या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पुन्हा घ्यावी, यासाठी जि.प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांच्या कक्षात जावून ठिय्या मांडला. सभापतींनी शिक्षणाधिकाऱ्यांना चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे आदेश दिले. या परीक्षार्थ्यांमध्ये ही वायगाव (नि़) येथील सरस्वती विद्यामंदिरचे विद्यार्थी होते.
सदर विद्यार्थ्यांच्या पालकांनी मराठीमध्ये अर्ज सादर केले होते़ यात माध्यमही मराठी निवडले गेले होते़ या विद्यार्थ्यांना जवाहर विद्यालय नवोदय प्रवेश परीक्षेकरिता अग्रगामी कान्व्हेंट हे केंद्र देण्यात आले होते़ या केंद्रावर मराठी माध्यम निवडलेल्या विद्यार्थ्यांनाही इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या़ यामुळे विद्यार्थ्यांची गोची झाली़ मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकांची मागणी करूनही इंग्रजी माध्यमाच्याच प्रश्नपत्रिका देण्यात आल्या़ परीक्षेसाठी भरलेल्या अर्जामध्ये मराठी माध्यम निवडण्यात आले होते़ यामुळे आपल्याला मराठीतूनच उत्तरे द्यावी लागणार आहेत, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा होती; पण ऐनवेळी इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका समोर आल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला़ यामुळे सरस्वती विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित पेपर सोडविता आला नाही़ यात विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे़
यामुळे सदर विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घ्यावी, अशी मागणी विलास शिंदे, मधुकर ढगे, निलेश तिखे, अयज खेडकर, नारायण होले, प्रतिभा पाटील, शीला सुपारे, घनश्याम पाटील यांच्यासह अन्य पालकांनी केली आहे़ पालकांनी अग्रगामी कॉन्व्हेंटचे केंद्राधिकारी व जि़प़ शिक्षण सभापतींना याबाबत निवेदन सादर केले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)