नांदगाव चौकात झाली अखेर गतिरोधकाची निर्मिती
By Admin | Updated: April 23, 2015 01:52 IST2015-04-23T01:52:58+5:302015-04-23T01:52:58+5:30
हिंगणघाट-हैद्राबाद मार्गावरील अत्यंत वर्दळीचा असलेल्या नांदगाव चौकातील जीर्ण झालेल्या गतिरोधकामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती़

नांदगाव चौकात झाली अखेर गतिरोधकाची निर्मिती
लोकमतचा प्रभाव
नांदगाव (बु़) : हिंगणघाट-हैद्राबाद मार्गावरील अत्यंत वर्दळीचा असलेल्या नांदगाव चौकातील जीर्ण झालेल्या गतिरोधकामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती़ याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले़ या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने पुढाकार घेत या चौकात नव्याने गतिरोधकाची निर्मिती केली़ यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला़
नागपूर-पांढरकवडा महामार्गावर असलेल्या हिंगणघाट येथील नांदगाव चौकातून होणारी वाहतूक पाहता रस्ता पार करणे नागरिकांसाठी अवघड झाले होते. येथून रस्ता पार करताना अनेक अपघात झालेत़ यात काहींना प्राणास मुकावे लागले. या चौकातून परिसरातील नागरिकांना शहरात दाखल होण्याकरिता मार्ग आहे. या चौकातच पेट्रोलपंप असून वाहनांची तशीही येथे वर्दळ असते. येथून प्रवाश्यांना बस पकडावी लागते. यामुळे प्रवाश्यांचीही या चौकात वर्दळ असते. या चौकातून रस्ता पार करताना शाळकरी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून रस्ता पार करावा लागत होता़ या मार्गावरील वाहनांची वर्दळ आणि वाढते अपघात पाहता येथे गतिरोधक लावण्यात आले होते; पण ते अलिकडे जीर्ण झाले होते़ शिवाय याकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली होती़
संभाव्य धोका लक्षात घेता ‘लोकमत’ ने याबाबत वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे तथा लोकप्रतिनिधींचे याकडे लक्ष वेधले. याची दखल घेत प्रशासनाने नव्याने गतिरोधक तयार केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला़
नांदगाव नव्याने गतिरोधक तयार करण्यात आल्याने अपघाताची भीती दूर झाली़ यामुळे आता प्रवाश्यांनाही बस पकडणे व नागरिकांना शहरात दाखल होणे शक्य होईल़(वार्ताहर)