महिलेच्या आत्महत्येने पेटले अतिक्रमण
By Admin | Updated: February 3, 2015 22:59 IST2015-02-03T22:59:10+5:302015-02-03T22:59:10+5:30
अतिक्रमण हटविण्याच्या धडक मोहिमेत घर जमीनदोस्त झाल्याने मानसिक धक्का बसलेल्या महिलेने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली़ हे वृत्त पसरताच रात्रीपासून खदखदणारा

महिलेच्या आत्महत्येने पेटले अतिक्रमण
नागरिकांत संताप : पुलगावात कडकडीत बंद
पुलगाव : अतिक्रमण हटविण्याच्या धडक मोहिमेत घर जमीनदोस्त झाल्याने मानसिक धक्का बसलेल्या महिलेने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली़ हे वृत्त पसरताच रात्रीपासून खदखदणारा असंतोष उफाळून आला़ संतप्त नागरिकांनी मंगळवारी बसपाच्या नेतृत्वात मोर्चा काढत ही मोहीम त्वरित बंद करण्याची मागणी केली़ भाजप, शिवसेनेनेही यात सहभाग घेतला़ फुटाणा लाईन येथे तुरळक दगडफेक झाली तर अनेकांनी रस्त्यांवर टायर जाळून संताप व्यक्त केला़ मंगळवारी शहरात तणावपूर्ण शांतता होती़ अतिक्रमण हटाव मोहिमेच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला़
उच्च न्यायालय व राज्य शासनाच्या आदेशान्वये सुंदर व स्वच्छ शहर मोहिमेंतर्गत २८ जानेवारीपासून शहरात नगर प्रशासनाद्वारे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे़ शहराचा मध्यभाग असलेल्या गांधी चौक, भगतसिंग चौक, तुकडोजी चौकासह रस्ते व नाल्या मोकळ्या करण्यासाठी गल्ल्यांतील अतिक्रमण हटविले़ काहींनी आधीच अतिक्रमण हटविले तर कुणी विरोधही केला नाही; पण सोमवारी सायंकाळी ४ ते ६ च्या सुमारास रामनगर परिसरात रस्त्यावरील अतिक्रमण हटविताना २० ते ३० घरे जमीनदोस्त केली़ यामुळे नागरिकांना कच्च्या-बच्च्यासह उघड्यावर रात्र काढावी लागली़ हे दृश्य पाहून अतिक्रमण हटविताना गरिबांचे संसार रस्त्यावर आणू नका, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत होती़ आज अतिक्रमण हटाव मोहिमेच्या निषेधार्थ शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरात या मोहिमेच्या निषेधार्थ सोमवारी रात्री १० वाजता पोलीस ठाण्यासमोर नागरिकांनी रस्ता रोको केला़ ही कार्यवाही त्वरित थांबविण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस प्रशासनास देण्यात आले़
सकाळी नाचणगाव नाका, देवळी नाका, इंदिरा चौक, महावीर चौक भागात टायर जाळून संताप व्यक्त केला़ बसपाने सकाळी ११ वाजता बौद्ध विहार परिसरातून मोर्चा काढला़ फुटाणा लाईन येथे एका दुकानावर तुरळक दगडफेक झाली. यात पतालिया किरकोळ जखमी झाल्या. मोर्चेकऱ्यांनी सकाळी ११ वाजेपासून नगर परिषद परिसराला घेराव करीत जोरदार निदर्शने केली़ न्याय मिळेपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका घेतली़
परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते़ बसापाद्वारे आयोजित मोर्चात जिल्हा प्रमुख उमेश म्हैसकर, कुंदन जांभुळकर, राजेश लोहकरे, विनोद गावंडे, गौतम गजभिये, भाजपचे शहराध्यक्ष नितीन बडगे, कपील शुक्ला, मंगेश झाडे, गणेश ऐतबान, शिवसेनेचे नंदकिशोर मोहोड, नरेश ठाकूर, भाजपा नगरसेवक व बसपा कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन निदर्शने केली़(तालुका प्रतिनिधी/प्रतिनिधी)
३१ मार्चपर्यंत मिळणार बेघरांना घरकूल; प्रशासन व आंदोलकांत समेट
सकाळी ११ वाजतापासून नगर परिषदेसमोर शासनाचा निषेध करीत असलेल्या बसपा नेते व नगर प्रशासनात समेट होऊन दुपारी २ वाजता हे आंदोलन थांबविण्यात आले़ भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे, मिलिंद भेंडे, राजेश बकाने, शहराध्यक्ष नितीन बडगे यांनी हा समेट घडवून आणला. अतिक्रमणात ज्यांचे संसार रस्त्यावर आले त्यांना ३१ मार्च १५ पर्यंत घरकूल योजनेत घरे देण्यात येणार असून तोपर्यंत त्यांची नगर परिषदेकडून पर्यायी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्याधिकारी राजेश भगत यांनी बसपाचे उमेश म्हैसकर, कुंदन जांभुळकर, राजेश लोहकरे यांना दिले़ आज दिवसभर शहरात तणावपूर्ण शांतता असल्याने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता़