परवानगी न घेता विहिरीवर अतिक्रमण
By Admin | Updated: May 25, 2016 02:19 IST2016-05-25T02:19:31+5:302016-05-25T02:19:31+5:30
कुठलीही परवानगी न घेता सोनेगाव (बाई) येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील कच्च्या विहिरीवर वीज वितरण कंपनीने वीज तारा टाकून रोहित्र बसविले.

परवानगी न घेता विहिरीवर अतिक्रमण
वीज वितरणचा प्रताप : सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर
वर्धा : कुठलीही परवानगी न घेता सोनेगाव (बाई) येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील कच्च्या विहिरीवर वीज वितरण कंपनीने वीज तारा टाकून रोहित्र बसविले. यामुळे सदर कच्च्या विहिरीचे बांधकाम व खोदकाम रखडले आहे. त्यामुळे हा प्रकार थांबवून रोहित्र हटवावे अशी मागणी शेतकरी हरिदास गणपत गोटे यांनी जिल्हाधिकारी व महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना निवेदनाद्वारे केली आहे.
देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथील हरिदास गणपत गोटे यांचे मौजा चिखली येथे सर्व्हे नं. २६३, आराजी १ हेक्टर ६२ आर असे शेत आहे. या शेतात त्यांची स्वत:ची विहीर आहे. पैश्याअभावी ते अद्याप विहिरीचे बांधकाम व चांगले खोदकाम करू शकले नाही. यंदा त्यांनी शेतात डाळींबाची लागवड केली आहे. विहिरीचे पाणी पुरत नसल्याने काही दिवसांनी विहिरीचे खोदकाम ते सोबतच पक्के बांधकामही करणार होते. असे असताना वीज वितरण कंपनीने त्यांची कुठलीही परवानगी न घेता शेतातील विहिरीच्या अगदी तोंडावर रोहित्राचे खांब घेतले. तसेच विहिरीच्या उजव्या हातावर शिवपांदन रस्ता असतानाही रोहित्र टाकण्याची व्यवस्था केली. हा प्रकार जीवघेणा ठरत आहे. तसेच रोहित्रामुळे विहिरीचे बांधकाम व खोदकाम करण्यास अडचण येत आहे. ये जा करण्याचा रस्ताही यामुळे बाधित झाल्याने अडचण येत आहे.
रोहित्र विहिरीच्या अगदी तोंडावर असल्यामुळे आणि वीज पुरवठा सुरू असल्याने विहिरीचे खोदकाम होऊ शकत नाही. याचा परिणाम डाळींब पिकाच्या सिंचनावर होत आहे. झाडे वाळण्याच्या मार्गावर आहे.
शेतातील विहिरीच्या तोंडावर बसविलेले रोहित्र ताबडतोब हटवावे आणि विहीर खोदकाम व पक्क्या बांधकामासाठी मोकळी करू अद्यावी अशी मागणी गोटे यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे केली आहे. रोहित्र न हटविल्यास आत्महत्या करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी निवेदनातून दिला आहे.(शहर प्रतिनिधी)