तळेगाव (टा़) : वर्धा ते अल्लीपूर मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली ४७ घरांवर बुलडोजर चालविण्यात आला़ यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आले़ १५ दिवसांपूर्वी अतिक्रमण काढले; पण घरांचा मलबा अद्याप जैसे थे आहे़ विटा, सिमेंट व मातीचा हा खच सध्या नाल्यांमध्ये गेल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहताना दिसते़पावसाळ्याला सुरूवात झाली असून प्रशासन घरांचा मलबा उचलण्यास दिरंगाई करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे़ कारवाई कायद्याच्या चौकटीतच असल्याचे बांधकाम विभाग सांगत आहे़ तळेगाव ते एकुर्ली हा सहा किमी रस्ता पूर्वी जि़प़ कडे होता़ हा पांदण रस्ता जि़प़ ने २००१ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागास हस्तांतरीत केला़ या मार्गावर ३.७५ मीटरचे डांबरीकरण होते़ हा मुख्य जिल्हा मार्ग १९ असल्याने सर्र्वप्रथम दीड लाख रुपये जमा करून भूमिअभिलेख विभागाद्वारे मोजमाप करण्यात आले. यानुसार महसूल विभागाने २५ मीटर म्हणजे ८० फुट जागा शासकीय असल्याचे मार्कींग करून दिली होती़ त्यानुसार नोटीस देत कारवाई करण्यात आली़ अतिक्रमण काढल्यावर घरांचा मलबा बांधकाम विभागाने अद्याप उचलला नाही़ या मलब्यामुळे नाल्या बुजल्या आहेत़ रस्त्याच्या बाजूने उखडलेली जागाही जैसे थे ठेवण्यात आली आहे़ यामुळे वाहतूकही धोक्यात आली आहे़ घर, दुकानांसमोर मलबा असल्याने नागरिकांची गोची झाली आहे़ पावसाळा असल्याने घरात पाणी शिरण्याची शक्यता बळावली आहे़ बांधकाम विभागाने गावातील मलबा त्वरित उचलावा, अशी मागणी होत आहे़(वार्ताहर)
अतिक्रमण हटविले मलबा ‘जैसे थे’
By admin | Updated: June 14, 2014 01:18 IST