बसमधील राखीव जागांवर अतिक्रमण
By Admin | Updated: July 13, 2015 02:15 IST2015-07-13T02:15:58+5:302015-07-13T02:15:58+5:30
महामंडळाच्या बसगाड्यात विशिष्ट व्यक्तींसह अपंगाकरिता राखीव जागा निश्चित केल्या आहेत.

बसमधील राखीव जागांवर अतिक्रमण
दुर्लक्ष : अपंग व्यक्ती सोसतात यातना
वर्धा : महामंडळाच्या बसगाड्यात विशिष्ट व्यक्तींसह अपंगाकरिता राखीव जागा निश्चित केल्या आहेत. प्रवासा दरम्यान अपंग व्यक्तींना त्रास होऊ नये म्हणून प्रारंभीलाच जागा राखीव केली आहे. मात्र या जागेवर प्रवाशांकडून जागा बळकावण्याचा प्रकार होत असल्याचे दिसते. यामुळे प्रवासात अपंग व्यक्तींना त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसते.
‘केवळ महिलांसाठी, अपंगांसाठी राखीव’ लिहिलेल्या आसनावर त्यांना बसविण्याचे सौजन्य वाहकाकडून दाखविले जात नसल्याची तक्रार अपंग व्यक्तींनी आगार प्रमुखांकडे केली आहे. यामुळे आरक्षणाचा हेतू साध्य होताना दिसत नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये आमदार, खासदार, अपंग, महिला, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक यांकरिता राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. आसनाच्या मागे व खिडकीजवळ सदर जागा राखीव असल्याची सूचना लिहली असते. याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. याची जबाबदारी वाहकांची असते. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे. फलाटावर बस येताच खिडकीतून जागेवर रूमाल, बॅग अशा वस्तू टाकून जागा आरक्षित केली जात असल्याचे प्रकार घडतात. मात्र अपंग व्यक्तींना हे शक्य होत नाही. परिणामी बसमध्ये चढल्यानंतर गर्दीमुळे अपंगांना उभे राहून प्रवास करावा लागत असल्याची स्थिती आहे. नियमांच्या अंमलबजावणीची मागणी करण्यात येत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)